भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचा मध्यंतरी एक फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे ते टीकेचे लक्ष्य ठरले. ओडिसामधील पुरी लोकसभा मतदारसंघातील जामुगांडा या गावात एका आदिवासी कुटुंबाला भेट देऊन त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. याचे फोटो त्यांनी स्वतःच आपल्या ट्विटरवर पोस्ट केले. मात्र एका फोटोत लहान मुली त्यांच्या जेवणाकडे बघत असल्यामुळे पात्रा यांच्यावर अनेकांनी टीका केली. फोटोवरून टीका होण्याची पात्रा यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही मतदारसंघातील गरीब कुटुंबासोबत जेवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. उलट अशा फोटोंमधून प्रसिद्धीचे गणित अचूक साधण्याची किमया पात्रा यांना जमते. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुरी लोकसभेत विजय मिळविण्यासाठी पात्रा यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने टीव्हीवरील चर्चेतला चेहरा म्हणून नाव कमावलेल्या संबित पात्रा यांना पुरी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले. निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना पात्रा यांना उमेदवारी मिळाली होती. त्या वेळी कमी दिवसांतदेखील त्यांनी प्रचाराच्या नव्या क्लृप्त्या शोधून काढल्या. ज्यामुळे त्यांच्या आणि विजयी उमेदवाराच्या मतांच्या टक्केवारीत फार मोठे अंतर दिसले नाही. बिजू जनता दलाच्या उमेदवार पिनाकी मिश्रा यांचा केवळ ११,७१४ मतांनी विजय झाला. पुरी लोकसभा मतदारसंघात भाजपाची संघटना बळकट नसतानाही पात्रा यांनी चांगली लढत दिली.
या वेळी लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असतानाच ४८ वर्षीय पात्रा मतदारसंघात उतरलेले दिसत आहेत. खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासाठी नक्कीच ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जाते. पात्रा यांनी ११ एप्रिल रोजी पुरी जिल्ह्यातील समंग पंचायतीत स्थानिक उत्सवात सहभाग घेतला.
हे वाचा >> संबित पात्रा! भाजपाच्या या स्टार प्रवक्त्याकडे किती आहे संपत्ती?
मागच्या लोकसभा निवडणुकीत पात्रा यांच्यावर ‘बाहेरचा माणूस’ असा शिक्का मारण्यात आला होता. या वेळी पात्रा यांनी जाणीवपूर्वक हा शिक्का पुसून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हात पारंपरिक धोती-कुर्ता, त्यावर भगवा गमछा, कपाळावर चंदनाचे गंध लावून पात्रा पुरी मतदारसंघात पद्धतशीर प्रचार करत आहेत. अनेक गावांमध्ये अन्नदानासारखे कार्यक्रम घेऊन किमान एका कुटुंबाला ते स्वतःच्या हाताने अन्न भरवितात. काही गावांत मतदाराच्या घरीच रात्री मुक्काम करणे, गावकऱ्यांच्या मोटारसायकलवर मागे बसून मिरवणुकीत सहभागी होणे, पुरीच्या मच्छीमार वस्त्यांमध्ये त्यांच्यासोबत गाणी गाणे आणि स्थानिकांसोबत मंत्रोच्चार करत तलावात स्नान करण्यासारखे लोकानुनय करणारे अनेक कार्यक्रम पात्रा यांनी हाती घेतले आहेत.
यासोबतच जगन्नाथ पुरीमधील प्रसिद्ध असलेल्या भगवान जगन्नाथाची मूर्ती हातात घेऊन त्यांनी गावांमध्ये प्रचार केला. त्यांच्या या कृतीवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. तसेच देवी-देवतांचा वापर निवडणुकीसाठी केल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ओडिसामधील एका भाजपा नेत्याने सांगितले की, पात्रा यांना भलेही सोशल मीडियावर ट्रोल केले जात असेल, पण ते पुरीमधील सामान्य लोकांशी जोडले जात आहेत, हेही तितकेच खरे आहे. दिल्लीचा नेता अशी जी त्यांची प्रतिमा होती, ती बदलण्यात त्यांना बरेच यश मिळाले आहे. पात्रा हे पुरीमधील लोकांपैकीच एक असल्याचा समज त्यांनी रुजवला आहे.
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्रा यांना २०२४ मध्येही पुरी लोकसभेत उमेदवारी मिळणार आहे. वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पात्रा यांनी पुरीमध्ये आपले बस्तान बसवले आहे. हल्ली ते दिल्लीपेक्षा जास्त वेळ पुरी येथेच थांबतात. भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री, तसेच रानपूर विधानसभेच्या आमदार सुरमा पाध्या म्हणाल्या की, पात्रा यांना आता पुरी लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सातही विधानसभा क्षेत्रांत स्वीकारले गेल्याचे चित्र दिसत आहे. पाध्या यांचा रानपूर विधानसभा मतदारसंघ हा पुरी लोकसभेच्या अखत्यारीत येतो.
“मागच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पात्रा यांनी पुरी येथे दौरे वाढवले. लोक आता पात्रा आणि बिजू जनता दलाच्या नेत्या पिनाकी मिश्रा यांची तुलना करत आहेत. पिनाकी मिश्रा विजयी झाल्यानंतर मतदारसंघात फिरकलेल्या नाहीत. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत पात्रा नक्कीच चांगली कामगिरी करतील,” असा विश्वास पाध्या यांनी व्यक्त केला. पात्रा यांचा २०१९ साली पराभव झाला असला तरी त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपाला पुरी आणि ब्रह्मगिरी या दोन विधानसभा मतदारसंघांत विजय मिळाला होता.
तसेच याआधीच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०१९ साली भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले. २०१४ साली भाजपाच्या अशोक साहू यांना २.१५ लाख मते मिळाली होती. तर पात्रा यांना त्यांच्याहून दुप्पट ५ लाख २६ हजार मते मिळाली.
बिजू जनता दलाचे सचिव बिजय नायक यांनी मात्र पात्रा यांच्या प्रयत्नांवर टीका केली. “पात्रा हे नाटकी असून, सध्या ते करत असलेला प्रचार नाटकी स्वरूपाचा आहे. २०१९ साली पुरीच्या जनतेने त्यांना उत्तर दिले होतेच. पुढील निवडणुकीतदेखील त्यांचा पराभव होईल. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याप्रमाणेच बीजेडीचे नेते लोकांसोबत जोडलेले आहेत. आम्ही कठोर परिश्रमाला महत्त्व देतो आणि परिश्रमातून निकाल मिळतोच,” अशा शब्दांत पात्रा यांच्यावर टीका करताना नायक यांनी बिजू जनता दलाचे कौतुक केले.