रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीला पंधरा महिन्यांचा अवधी आहे. तरीही भारतीय जनता पक्ष अतिशय वेगाने कामाला लागला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ व आता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या जाहीर सभा झाल्या. गेल्या वेळी गमाविलेला हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्याकरिता भाजपने कंबर कसली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजप-शिवसेना युतीने चांगले यश मिळविले होते. पण चंद्रपूरचा गड भाजपला गमवावा लागला होता. काँग्रेसने ही जागा जिंकली होती. हा पराभव भाजपला फारच वर्मी लागला होता. यातूनच यंदा चंद्रपूरवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या लोकसभा मतदार संघात भाजपने २ हजार १८५ बुथची रचना केली आहे. या बुथवरील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा २४ कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार केंद्रीय पातळीवरील नेत्यांचे लोकसभा प्रवास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक उद्योगपतींपासून तर व्यापारी, प्रतिष्ठीत मंडळी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या बैठकांसह एक छोटेखानी जाहीर सभा देखील घेतली. त्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही या जिल्ह्याचा दौरा करताना महिलांशी संवाद साधला. या भागातील समस्यांसोबतच महिलांचे प्रश्न जाणून घेतले. महिलांचा मेळावा घेतला. २ जानेवारीला राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुस्लीम धर्मीयांचे श्रध्दास्थान दर्गा व हिंदूसाठी पवित्र माता महाकाली मंदिर असा सामाजिक समतोल राखत नड्डा यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

हेही वाचा… राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना शह देण्यासाठीच सांगली बँकेची चौकशी? भाजपच्या स्थानिक नेत्यांमागे ससेमिरा

मुनगंटीवार की अहिर ?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप देशात ज्या १४४ जागांवर पराभूत झाला, त्या सर्व जागांवर पक्षाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याची सुरुवातच नड्डा यांनी चंद्रपुरातून केली आहे. २०१९ च्या पराभवानंतरही माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर येथे अधिक सक्रीय आहेत. वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी २०२४ मध्ये पक्षाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुनगंटीवार व अहिर या दोन नावांची चर्चा सुरू आहे. भाजपच्या वर्तुळातून किंवा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी त्यांच्या दौऱ्यात अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली तरी चंद्रपुरातील भाजपचे हे दोन्ही नेते पक्षाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, नड्डा यांनी या दौऱ्यात भाजपची संघटनत्मक बैठक घेऊन २४ कलमी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले. यानंतरच्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध खात्याचे मंत्री व शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होणार आहे. एकूणच भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या तुलनेत काँग्रेस पक्षात शांतता दिसून येत आहे. या जिल्ह्यात माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे असे तीन आमदार व एक खासदार आहे. मात्र काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह बघावा तर शून्य आहे. नेत्यांमध्ये आपसात कुरघोडी सुरू आहेत.

हेही वाचा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बुधवारपासून महिला ‘जनजागर यात्रा’

जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेस मध्येही गटबाजी तीव्र आहे. युवक काँग्रेस, एनएसयुआयचे काम नेमके कुठे सुरू आहे याचा शोध घ्यावा लागतो. सेवादल तर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मंचावर दिसते. काँग्रेस पक्षात अंतर्गत लाथाळ्याच दिसून येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचे नियोजन या पक्षात दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वगळता गेल्या काही महिन्यात काँग्रेसचा एकही बडा नेता या लोकसभा क्षेत्रात फिरकला नाही. यावरूनच काँग्रेस निवडणुकीच्या बाबतीत किती गंभीर आहे हे दिसून येते. उलट काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांची या जिल्ह्यातील वर्दळ वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, स्वत: खासदार शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे मेळावे घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे.

हेही वाचा… औरंगाबादमध्ये हिंदुत्वाभोवतीच निवडणुकांची रणनीती ठरविण्याचे भाजपाचे नियोजन; गाभा समिती सदस्यांबरोबर जे. पी. नड्डा यांची बैठक

स्थानिक स्वराज्य संस्था तथा आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागास आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या भेटी घेऊन योग्य तो संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर बरीच समीकरणे बघायला मिळू शकतात.