मुंबई : भाजपने दीड कोटी कार्यकर्ता नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट ठेवून महाशक्तीमान होण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. ‘शत प्रतिशत’ भाजप हेच अंतिम लक्ष असून त्याचा रालोआ (एनडीए) तील घटकपक्षांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेश अधिवेशन रविवारी शिर्डीत पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘पंचायत ते संसद’ भाजपचा झेंडा उभारण्याचा नारा देत ‘शत प्रतिशत’चा बिगुल वाजविला. त्यादृष्टीने भाजपने संघटनात्मक बांधणी व प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर पक्षाचा पाया विस्तारण्याची पावलेही टाकली गेली आहेत. भाजपची एकेकाळी शेठजी व भटजींचा पक्ष अशी ओळख होती. पण अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, मराठा, गुजराती, उत्तर भारतीय आदी सर्वच जातींच्या कार्यकर्त्यांना भाजपने सामावून घेतले आहे. भाजपने एक कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा दोन-तीन वर्षांपूर्वीच ओलांडला. त्या जोरावर लोकसभा निवडणूक लढली, पण राज्यात मोठा फटका बसला. तरीही निराशेवर मात करून भाजपने निकराचे प्रयत्न केले आणि लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत ६३ लाख मतांची भर घालून महायुतीने तीन कोटी ११ लाख मते मिळविली.
एक कोटी कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपने मोठा विजय मिळविला असला तरी आता कार्यकर्त्यांचा पाया तब्बल ५० टक्क्यांनी काही दिवसांतच वाढविण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. युती किंवा एनडीए म्हणून वाटचाल करताना जे मतदारसंघ शिवसेनेकडे होते, तेथे २५-३० वर्षात भाजप फारशी वाढलीच नाही. आता प्रत्येक मतदारसंघ व बूथपातळीपर्यंत पक्षाची ताकद वाढविली जाणार असून पाया भक्कम केला जाणार आहे. राज्यातील मतदारांची संख्या सुमारे नऊ कोटी असून मतदान ६०-७० टक्के होते. त्यामुळे जर ५० लाख कार्यकर्ते वाढले, त्यांच्या माध्यमातून किमान दीड-दोन कोटी मतदार जोडण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. भाजप केवळ काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचे मतदार वळविणार नसून त्याचा फटका शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनाही बसणार आहे.
आणखी वाचा-मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
सत्ता मिळाल्याने सुखासीन न होता सरकारच्या माध्यमातून जनतेची कामे करण्याचा व संघटनेची ताकद वाढविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प पुरेसा सूचक आहे. सध्या वातावरण भाजपसाठी उत्तम असून नागरिकांना आपण भाजपशी जोडलेले असावे, असे वाटत आहे. या वातावरणाचा फायदा करून घेण्याचे भाजपचे नियोजन आहे. त्यामुळे शहा, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींसह सर्वच वरिष्ठ नेते सदस्य नोंदणीच्या माध्यमातून ताकद वाढविण्याची सूचना करीत आहेत. भाजप २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुका युतीने तर २०२९ च्या स्वबळावर लढणार, असे शहा यांनी गेल्या वर्षी जाहीर केले. पण भाजप खूपच धोरणी असून ते २०२९ पर्यंत वाट बघत बसणार नाहीत. महिनाभरात दीड कोटी सदस्य नोंदणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी तरी स्वबळाची चाचपणी करणार, हे मात्र नक्की.