हर्षद कशाळकर
अलिबाग : आगामी लोकसभा निवडणूकीत स्वबळावर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. त्यादृष्टीने पक्षाची पाऊले पडण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यात आला आहे. पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत.
रायगड लोकसभेची जागा आजवर शिवसेना लढत होती. शिवसेनेचे अनंत गिते हे रायगडमधून लोकसभेचे उमेदवार असायचे. मात्र गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेगटाकडे लोकसभेची जागा लढवून निवडून येऊ शकेल असा उमेदवार राहीलेला नाही. ही बाब लक्षात घेऊन भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरु केली आहे. शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा पक्ष प्रवेश हा त्याच रणनितीचा एक भाग आहे.
हेही वाचा… भाजपमधील ‘लाभार्थीं’चा सांगली बँक घोटाळ्यातील चौकशीस लगाम ?
रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या सहा मतदारसंघाचा समावेश होतो. यापैकी पेण हा एकमेव मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. तर अलिबाग, महाड, दापोली हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसची तर गुहागर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाची पकड आहे. अशा परिस्थितीत संपुर्ण मतदारसंघावर प्रभाव पाडू शकेल असे नेतृत्व भाजपकडे नव्हते. शिंदे गटानेही रायगडची लोकसभा निवडणूकीत फारसे स्वारस्य दाखवले नव्हते. त्यामुळे मतदारसंघातील ही पोकळी आता धैर्यशील पाटील भरून काढणार आहेत.
हेही वाचा… ‘शिवगर्जने’तून विदर्भात संघटना मजबूत करण्यावर ठाकरे गटाचा भर
२०२४ ची लोकसभा निवडणूकीत धैर्यशील पाटील हे भाजपचे रायगड लोकसभेचे उमेदवार असू शकतात. तसे संकेत त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात दिलेत. ‘मला राष्ट्रीय प्रवाहात काम करायचे असल्याने मी भाजपत दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच भाजपने धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा… आता तरी सांगा सोलापूरचे ‘महेश कोठे’ कुणाचे ?
धैर्यशील पाटील हे उत्तम वक्ते आहेत. या पुर्वी पेण मतदारसंघातून दोन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. पेण मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा भाजपला होऊ शकणार आहे. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे शेकापची मते भाजपकडे खेचण्यात धैर्यशील महत्वाची भुमिका बजावू शकणार आहेत. शेकाप लोकसभा निवडणूक लढवत नाही. त्यामुळे पक्षाची मते सहजपणे त्यांच्या बाजूने वळविणे शक्य होणार आहे.
हेही वाचा… Maharashtra Budget Session 2023-2024 Live: “कसब्यातली जागा भाजपाकडून जातेय”, संजय राऊतांचा दावा!
भाजपचा मध्यमार्ग
गेल्या विधानसभा निवडणूकीत पेण मतदारसंघात भाजपचे रविंद्र पाटील आणि शेकापचे धैर्यशील पाटील यांच्यात मुख्य लढत झाली होती. यात धैर्यशील पाटील यांचा पराभव झाला होता. आता धैर्यशील पाटीलच भाजपवासी झाल्याने पेण मतदारसंघातील रविंद्र पाटील यांच्या वाटचालीतील अडसर दूर झाला आहे. मतदारसंघ भाजपसाठी अधिक सुरक्षित झाला आहे. दोघांनीही एकमेकांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारल्याने, मतदारसंघावरची पक्षाची पकड घट्ट झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रविंद्र पाटील यांच्या सुनेला बहुधा उमेदवारी दिली जाऊ शकते.
शेकापची ताकद अटली
रायगड जिल्हा हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा एकही आमदार निवडून आला नव्हता. विविध नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. धैर्यशील पाटील यांच्या पक्षांतरामुळे रागयडमध्ये शेकापला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.