रत्नागिरी : राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणाला झुकतं माप मिळाल्यामुळे इथला सामान्य माणूस खूष झाला असला तरी यातून या प्रदेशावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच स्पष्ट होत आहेत.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार असले तरी एकालाही मंत्रीपद मिळालेलं नाही. त्याऐवजी अखेर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाने उमेदवार दिला नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंडित शिवसेनेचे पाचपैकी चार आमदार होते. पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपात रत्नागिरीचे मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटाची वाट धरली. ठाकरे गटाचे माजी मंत्री भास्कर जाधव आणि राजन साळवी टिकून राहिले. या विधानसभा निवडणुकीत साळवींचा पराभव झाला. त्यामुळे आता जाधव एकाकी पडले आहेत. जिल्ह्यातील पाचवे आमदार अजितदादा पवार गटाचे शेखर निकम यांनी कडवी झुंज देत आपला गड शाबूत राखला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संकटमोचकाची भूमिका निभावणारे सामंत यांनी याही वेळी उद्योग खातं आपल्याकडे राखलं आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव कायम राहणार आहे. जोडीला त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनीही राजापूर मतदारसंघातून विजय मिळवत राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधू, तर रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधुंचं प्रभावक्षेत्र वाढलं आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सामंतांना मागील अडीच वर्षांप्रमाणे मैदान मोकळं राहिलेलं नाही.
हेही वाचा >>> अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. ते राज्यमंत्री असले आणि त्यांच्याकडे असलेली खाती फारशी महत्त्वाची नसली तरी मंत्रिपदाच्या बळावर कदम पिता-पुत्र जिल्ह्याच्या उत्तर भागात पकड मजबूत करू शकतात. मध्यंतरीच्या काळात सामंतांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन रामदास कदम यांनी सामोपचाराची भूमिका स्वीकारली. यापुढे मात्र ते सामंतांना अनिर्बंध सत्ता उपभोगू देणार नाहीत. त्याचबरोबर, खासदार राणे आणि मंत्री नितेश हेसुद्धा यापुढील काळात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त लक्ष घालणार, हे उघड आहे. दोन दिवसांपूर्वी राणेंनी घेतलेल्या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत त्याची झलक पाहायला मिळाली.
हेही वाचा >>> पाच आमदारांचे बळ देऊनही सांगली जिल्हा ‘पोरका’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांनी कुडाळमधून विधानसभेत प्रवेश केला आहे. शिवाय, विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले धाकटे चिरंजीव नितेश यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देऊन कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि संवेदनशील असं मत्स्य व बंदरे हे खातं सोपवलं आहे. स्वतः राणे गेली सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ निरनिराळ्या सत्तापदांवर कार्यरत असून सध्या लोकसभेत खासदार आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र मंत्रीपदाची संधी नाकारली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात गमावलेली राजकीय ताकद या विधानसभा निवडणुकीनंतर राणे कुटुंबाने पुन्हा मिळवली आहे.
पाच वर्षांपूर्वी राणे पिता-पुत्रांना भाजपामध्ये घेण्यामागचा पक्षश्रेष्ठींचा मुख्य हेतू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं कोकणातील वर्चस्व संपवणं, हा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो एव्हाना बऱ्यापैकी साध्य झाला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या रूपाने ठाकरे गटाचा एकमेव बुरुज शिल्लक होता. या निवडणुकीत तोही ढासळला आहे. त्यांच्यामागे गेल्या वर्षापासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ससेमिराही लावलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासह ठाकरेंचे इतर निष्ठावान सैनिक कितपत टिकाव धरतील, याबाबत शंका आहे. विरोधकांपैकी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिशय दयनीय आहे. आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यात प्रभावी असलेल्या शेकापलाही ओहोटी लागली आहे. अशा परिस्थितीत यापुढील काळात कोकणामध्ये महायुतीतील तीन घटक पक्षांमध्येच सत्ता स्पर्धा रंगणार आहे. त्यापैकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व रायगडात वजनदार नेते सुनील तटकरे व रत्नागिरी जिल्ह्यात आमदार निकम यांच्यामुळे आहे. राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बलवान झालेल्या भाजपाची रत्नागिरी जिल्ह्यात फारशी ताकद नसली तरी शिवसेनेच्या सामंत आणि कदम या दोन सत्ता केंद्रांमधील सुप्त स्पर्धेचा लाभ उठवत ते ती वाढवू शकतात. शिवाय, ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपाकडून चालू असल्याचं बोललं जातं. त्यात यश आलं तर जिल्ह्यात ठाकरे गट आणखी दुबळा होणार आहे. याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय सक्रिय राहिलेले भाजपाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. तसं झालं तर या प्रदेशातील त्यांचा अनुभव आणि राजकीय कौशल्याचाही फायदा भाजपाला मिळून या प्रदेशावरची पकड घट्ट होण्याची चिन्हं आहेत.