मोहन अटाळकर
मेडशी ( जि. वाशीम ) : ज्या पद्धतीने छोटे व्यापारी, लघु उद्योजकांना नोटाबंदी आणि चुकीच्या जीएसटीतून संपवण्याचे काम भाजप सरकारने केले, त्याच पद्धतीने देशातील शेतकऱ्यांना संपवले जात आहे, जेव्हा शेतमाल बाजारात आणला जातो, तेव्हा सरकार आयात निर्यात धोरणात बदल करते. त्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. शेती उध्वस्त करण्याचे काम हे सरकार करीत आहे, अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी मेडशी येथील जाहीर सभेत बोलताना केली.
शेतमालाला बाजारात किमान आधारभूत दर मिळत नाही. सरकारने नोटाबंदी आणि चुकीची जीएसटी लागू करून छोटे व्यापारी आणि लघु उद्योजकांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन चुकीच्या गोष्टी करून उद्योगांचा कणा निकामी केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे हे काही सरकारचे धोरण नव्हते, तर छोटे दुकानदार आणि’ व्यापाऱ्यांना मारण्याची दोन शस्त्रे होती. देशातील काळा पैसा नष्ट करू, असे नरेंद्र मोदी म्हणत होते, पण काळा पैसा आहेच की नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
देशातील साधन संपत्ती मोदी आपल्या जवळच्या दोन तीन मित्रांना देऊ इच्छितात. त्या लोकांची नावे आता सर्वांना माहीत झाली आहेत. शाळा, रुग्णालये यांचे खासगीकरण केले जात आहे. रेल्वे, विमानतळ या सारख्या पायाभूत सुविधा या निवडक लोकांना दिल्या जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकले जात आहेत, त्यामुळे बेरोजगार युवकांना संधी मिळू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.या देशात भीतीचे वातावरण तयार करून लोकांना एकमेकांपासून दूर लोटण्याचे, हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे. पण आपला देश अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. ते देशाला तोडण्याचे काम करीत आहेत, पण येथील जनता त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.