मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली आहे. शहरातील अनेक मंदिरे, जैन आणि अन्य समाजाच्या संस्थांशी संपर्क साधून त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. शहरातील धार्मिक संस्थांशी संवाद साधण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत येणार आहेत.
कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे, याचा चंग भाजपने बांधला असून क्षेत्रनिहाय विविध संस्थांशी संपर्क साधण्याचे नियोजन आहे. शहरात शेकडो धार्मिक संस्था, मंदिरे आणि संघटना कार्यरत आहेत. भाजपने हिंदुत्वाच्या भूमिकेतून या संस्थांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. संन्यास आश्रम देवस्थानच्या माध्यमातून शहरातील अनेक धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांना आमंत्रित करण्यात आले असून विलेपार्ले येथील पाटीदार हॉलमध्ये दुपारी पावणेचार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव या बैठकीस उपस्थित राहणार आहेत, असे वरिष्ठ भाजप नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हेही वाचा – छेडानगर जंक्शन अखेर वाहतूक कोंडीमुक्त
भाजपने हिंदुत्व जपले असून अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी केली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक संघटनांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजप प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडून धार्मिक संस्थांचेही पाठबळ मिळविणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी महाविकास आघाडीला भरभरुन मते दिली आणि त्याचा फटका भाजप व महायुतीला बसला. जर मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात, तर हिंदूंच्या मतांचेही ध्रुवीकरण करावे, असे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने धार्मिक संस्थांशी संपर्क व समन्वय साधण्यात येत असून धर्मरक्षणासाठी व हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार राज्यात सत्तेवर येण्यासाठी भाजपला पाठबळ देण्याचे आवाहन धार्मिक संस्था, संघटनांना करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा उपस्थित राहणार असून पक्षाच्या धार्मिक आघाडीकडूनही मोर्चेबांधणी करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.