मुंबई : हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपचे बळ वाढले असून विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल, असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील नेत्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य व उदासीनता आली होती. हरयाणातील विजयामुळे मात्र त्यांच्यात चैतन्य आले असून विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. भाजप स्वबळावर लढल्यास त्या राज्यात सत्ता येते, यावर हरयाणाच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक, प्रभारी भूपेंद्र यादव, शिवप्रकाश, अश्विनी वैष्णव आदी ज्येष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली. राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यातील प्रत्येक विभागात नुकताच दौरा केला. तीन पक्षांचे सरकार असल्याने आणि शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षातील नेत्यांमुळे अनेक इच्छुक नेत्यांना उमेदवारी मिळणार नाही, मंत्रीपदे किंवा महामंडळेही मिळाली नाहीत, आदी कारणांमुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपमध्येही उमेदवारीसाठी जाहीरपणेही जुंपली असून नाराज किंवा महायुतीकडून उमेदवारी मिळू न शकलेले नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांकडे धाव घेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे मनोबल हरविले होते आणि विधानसभेतही महाविकास आघाडीची सत्ता येणार, असे दावे आघाडीच्या नेत्यांकडून सुरु होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांकडे जाण्यासाठी भाजपसह महायुतीतील अन्य पक्षांमधील नेतेही संपर्कात होते. हर्षवर्धन पाटील, समरजीत घाडगे आदी नेत्यांनी भाजपला रामरामही ठोकला आणि अनेक नेते जाण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा >>>मराठवाड्यात पुन्हा एकदा ‘ जोडू या अतुट नाती’ चा खेळ

मात्र हरयाणातील विजयामुळे महाराष्ट्रातही तसाच चमत्कार भाजप आणि महायुती दाखवेल आणि सर्वेक्षण किंवा राजकीय आडाखे चुकतील, असा दावा आता भाजप नेत्यांनी करण्यास सुरुवात केली आहे. जे नेते महायुतीकडून महाविकास आघाडीकडे जाण्यासाठी कुंपणावर वाट पहात होेते, ते आता देशातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, हे लक्षात आल्याने माघारी वळतील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. हरयाणात भाजपने स्वबळावर लढून दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्रातही २०१४ मध्ये हा प्रयोग करण्यात आला होता आणि भाजपला १२३ जागा मिळाल्या होत्या व सत्ताही स्थापन करण्यात आली होती. भाजप २०२४ ची विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असून २०२९ मध्ये मात्र स्वबळावर लढेल, असे पक्षाची रणनीती सांगताना अमित शहा यांनी नुकतेच मुंबईतील मेळाव्यात स्पष्ट केले होते. भाजपची ताकद महाराष्ट्रात वाढली असून लोकसभेत अपप्रचारामुळे (फेक नॅरेटिव्ह) पराभव झाल्याचे राजकीय गणित फडणवीस यांनी पराभवाची कारणीमीमांसा करताना मांडले होते. लोकसभेत रा.स्व. संघ ताकदीने मैदानात उतरला नव्हता, मात्र विधानसभा निवडणूक तयारीसाठी संघ कार्यकर्ते उतरले आहेत. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी संघ व भाजप कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यांना हरयाणाच्या निकालाने ऊर्जा मिळाली असून अन्य पक्षांकडे धाव घेणाऱ्यांपैकी अनेक नेते भाजपमध्येच थांबतील, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची ताकद किंवा जादू संपली, असे लोकसभा निवडणूक निकालातून दिसून आल्याचा प्रचार सुरु झाला होता. हरयाणाच्या विजयामुळे देशातील जनता मोदींच्याच पाठिशी आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे फडणवीस व अन्य नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हरयाणाच्या विजयामुळे राज्यातील भाजप नेते व कार्यकर्ते विजय मिळविण्यासाठी जोमाने कामाला लागले असून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp strength in maharashtra due to haryana assembly election 2024 victory print politics news amy