नागपूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ‘ऑपरेशन टायगर ‘ साठी गुरुवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार व विद्यमान मंत्री आशीष जयस्वाल यांचे कट्टर विरोधक माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊन एक प्रकारे शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० तारखेला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे ( शिंदे) विद्यमान आमदार व नियोजन खात्याचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्या रामटेक मतदारसंघातील मनसर येथे त्यांची ‘ आभार ‘ सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतरचा हा शिंदे यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. शिवसेनेच्या ‘ ऑपरेशन टायगर ‘ मोहिमेचा एक भाग म्हणून या दौऱ्याकडे बघितले जात आहे. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करणार, असे आशीष जयस्वाल आणि विधानपरिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुळात शिंदे यांचा हा दौरा शिवसनेच्या ठाकरे गटांपुढे आव्हान निर्माण करण्यासाठी आहे, असे चित्र शिंदे गटाकडून निर्माण केले जात असताना दुसरीकडे मित्र पक्ष भाजपनेच शिंदे गटाला आव्हान देण्याची तयारी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे कट्टर विरोधक व रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना भाजपने पक्षात पुन्हा प्रवेश दिला. वरवर ही बाब भाजपची पक्षांतर्गत असली तरी त्यासाठी साधलेला मुहूर्त, ठिकाण व निवडलेला नेता हे महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या मनसरमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित केली त्याच मनसरमध्ये रेड्डी यांचा सोमवारी भाजप प्रवेशा सोहळा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यावेळी उपस्थित होते. ज्या रामटेक मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत त्याच मतदारसंघाचे रेड्डी माजी आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते सेना आमदार व मंत्री आशीष जयस्वाल यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे शिंदेच्या दौऱ्यापूर्वी सेना विरोधी आमदाराला पक्षप्रवेश देऊन भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले, अशी चर्चा आहे.

कोण आहेत मल्लिकार्जून रेड्डी ?

मल्लिकार्जुन रेड्डी हे भाजपचे रामटेकचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये जेंव्हा भाजप व शिवसेना स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढले तेंव्हा एकसंध शिवसेनेचे आशीष जयस्वाल व भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी अशी लढत झाली होती व रेड्डी विजयी झाले होते.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना युती होती व रेड्डी विद्यमान आमदार असल्याने रामटेकची जागा भाजपच्या वाट्याला गेली. पण तेंव्हा शिवसेनेत असलेल्या आशीष जयस्वाल यांना येथून लढण्याची इच्छा होती. परंतु युतीधर्म आड येत असल्याने आशीष जयस्वाल यांनी मल्लिकार्जुन रेड्डींच्या विरोधात बंडखोरी केली. या निवडणुकीत जयस्वाल यांनी रेड्डी यांचा पराभव केला. त्यामुळे जयस्वाल हे रेड्डी यांचे राजकीय शत्रू झाले.

२०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर जयस्वाल पुन्हा शिवसेनेत गेले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जयस्वाल यांना राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष केले. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर जयस्वाल यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे सोबत गुवाहाटीला गेले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत रामटेकची जागा शिवसेनेला गेली. ही जागा शिंदे सेनेला सोडण्यास रेड्डी यांचा विरोध होता. जयस्वाल यांनी २०१९ ची निवडणूक भाजप विरूद्ध लढवून युतीधर्माचा भंग केला होता. त्यामुळे रामटेकची जागा भाजपने लढवावी, असे रेड्डी यांचें म्हणणे होते. आपण जयस्वाल यांचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. परंतु जयस्वाल हे शिवसेनेत असले तरी ते भाजप नेते फडणवीस यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रेड्डींच्या नाराजी कडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे रेड्डी यांनी भाजप विरोधात बंड केले होते.

परिणामी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. रेड्डी हे भाजपमध्ये गडकरी समर्थक समजले जात होते. त्यांच्यावर निलंबन कारवाईमागे हेच कारण असल्याची चर्चा त्यावेळी होती. विशेष म्हणजे रेड्डींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असताना ते बावनकुळे यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी हजर होते. तेंव्हापासूनच निवडणुकीनंतर रेड्डी यांची घरवापसी निश्चित असल्याच्या चर्चा होत्या. त्याचा मुहूर्त शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी काढून भाजपने शिंदे सेनेला एक संदेश दिला आहे.