भाजपच्या उत्तरेतील बालेकिल्ल्याचा बुरूज पाडण्यात काँग्रेस वा ‘इंडिया’ आघाडीला यश मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे बहुमताचा २७२चा जादुई आकडा भाजपला उत्तरेतील राज्यांतूनच गाठता येऊ शकेल.

उत्तरेतील १२ राज्यांना कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आसाम ही तीन राज्ये जोडल्यास ३४८ जागांवर ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस वा घटक पक्षांशी भाजपने थेट लढाई लढली आहे. त्यापैकी सुमारे २८० जागा भाजपच्या पदरात पडू शकतील तर, ‘इंडिया’ आघाडीला सुमारे ६८ जागा मिळू शकतील, असा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज आहे.

हेही वाचा – खटाखट टू टकाटक व्हाया सफाचट! आरोप-प्रत्यारोपांमध्ये यमक जुळवणाऱ्या शब्दांनी कशी रंगली लोकसभेची निवडणूक?

केरळमध्ये भाजपने जागांचे खाते उघडले आणि तामीळनाडू, ओदिशा, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली तर भाजप स्वबळावर सहजपणे ‘साडेतीनशे पार’ होऊ शकेल, असे चित्र चाचण्यांमधून दिसत आहे.

भाजपचा भगवा कायम

२०१९ मध्ये गुजरात (२६), हिमाचल प्रदेश (५), उत्तराखंड (४) जागा जिंकल्या होत्या. यावेळीही भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकू शकेल. मध्य प्रदेशमध्ये २८, झारखंड १२, छत्तीसगढ ९, आसाम ९ या जागाही भाजप कायम राखू शकेल. पंजाबमध्ये भाजप स्वबळावर लढत असला तरी किमान दोन जागा मिळू शकतील. गेल्या वेळी अकाली दल व भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती व भाजपला ३ जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपचे नुकसान होत नसल्याचे दिसते. दिल्लीतही भाजप सर्वच्या सर्व ७ जागा जिंकू शकेल वा एखादी जागा हातून निसटू शकेल.

उत्तर प्रदेश-पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी

पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील ८० पैकी भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये किमान १० जागांची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगामध्ये भाजपच्या जागा १८ वरून २६ झाल्या तर ८ जागांची भर पडण्याची शक्यता असेल. अन्य राज्यांमध्ये भाजपचे होणारे जागांचा संभाव्य तोटा या दोन राज्यांमधून भरून निघू शकतो. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नव्हे तर भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो. ही राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी चपराक असेल. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेस व समाजवादी पक्षाची आघाडी पुन्हा फोल ठरण्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांनी दिले आहेत.

चार राज्यांमध्ये तोटा?

भाजपला हरियाणा, बिहार, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये काही जागांचा तोटा होऊ शकतो. गेल्यावेळी हरियाणामध्ये भाजपने सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र ३-५ जागांचे नुकसान होऊ शकते. राजस्थानमध्ये भाजपने २५ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी ३ हून अधिक जागांची घट होऊ शकते. बिहारमध्ये भाजप आघाडीला ७-८ जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ‘एनडीए’ला ४० पैकी ३९ जागा मिळाल्या होत्या. हरियाणा व राजस्थान दोन राज्यांमध्ये जाट मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. कर्नाटकमध्ये भाजपने २६ जागा जिंकल्या होत्या. इथे भाजपला ४-५ जागांचा तोटा होऊ शकतो.

हेही वाचा – मराठवाड्यात महाविकास आघाडीला लाभ ?

उच्चवर्णीय-ओबीसींसह दलितही?

‘इंडिया’ आघाडीला मुस्लिम व दलितांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे मानले जात आहे. मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज खरा ठरला तर २०१९च्या निवडणुकीप्रमाणे उच्चवर्णीय व ओबीसी हे दोन्ही मतदार भाजपशी एकनिष्ठ राहिल्याचे दिसू शकेल. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा वाढल्या तर गेल्यावेळी ‘बसप’ने जिंकलेल्या दहा जागा भाजपला मिळाल्याचे सिद्ध होऊ शकेल. तसे झाले तर दलित मतदारही भाजपकडे कायम राहिला असे म्हणता येऊ शकेल.