भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या रविवारी झालेल्या तीन तासांच्या बैठकीनंतरही कर्नाटकमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याबाबत दक्षता बाळगली जात आहे. आज, सोमवारी पुन्हा बैठक होण्याची शक्यता असून त्यानंतर उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाईल. या दिरंगाईतून कर्नाटकमध्ये संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपला धडपड करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सुमारे दीडशे मतदारसंघांतील उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, ‘संभाव्य उमेदवारांवर पुन्हा चर्चा होणार असून त्यानंतर सोमवारी वा मंगळवारी यादी जाहीर केली जाईल’, अशी माहिती दिली. वास्तविक, प्रत्येक मतदारसंघात तीन उमेदवारांच्या पर्यायांची यादी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे दिली होती. त्यावर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी सलग दोन दिवस पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चांमध्ये बराच खल झालेला होता. त्यानंतर मोदींसमोर उमेदवार निश्चितीसाठी फायदा-तोट्याचे गणित मांडले गेले. उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी भाजपला ताकही फुंकून प्यावे लागत आहे. त्यामागे बंडखोरीचा धोका हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. बंडखोरी टाळायची असेल तर, विद्यमान आमदारांना नाईलाजाने उमेदवारी द्यावी लागेल. उमेदवारी नाही दिली तर, हिमाचल प्रदेशची पुनरावृत्ती होऊ शकते. विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊन त्यांचा पराभव झाला तर पक्षाचा तोटा होईल. त्यामुळे कमीत कमी नुकसान होईल असा पर्याय मतदारसंघनिहाय निवडला जाणार असल्याने भाजपच्या उमेदवारांच्या निश्चितीमध्ये दिरंगाई होत असल्याचे सांगितले जाते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे पारंपरिक शिगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. २००८ पासून तीनवेळा या मतदारसंघातून बोम्मई विधानसभेचे सदस्य बनले आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची मागणीही मान्य झाल्याचे सांगितले जाते. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना शिकारपुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून विजयेंद्र यांना उमेदवारी देण्याचा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला होता. मात्र, येडियुरप्पा यांनी हा विचार हाणून पाडला असून आपल्या बालेकिल्ल्यातून विजयेंद्र यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर येडियुरप्पा ठाम राहिल्याचे दिसते. येडियुरप्पा भाजपच्या संसदीय पक्षाचे सदस्य असून त्यांचा कर्नाटकमधील प्रभाव उमेदवार निवडीवर परिणामकारक ठरतो!
हेही वाचा – महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा यशस्वी करण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
प्रचाराच्या रणनितीवर काँग्रेसचा खल
काँग्रेसने दोन याद्यांमधून १६६ उमेदवारांची घोषणा केली असून उर्वरित ५८ उमेदवार निश्चित करण्यासाठी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी रविवारी बैठक झाली. कर्नाटक प्रचाराच्या रणनितीसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती पक्षाचे कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी दिली. कर्नाटकमध्ये पोलीसभरती, प्राध्यापकांची भरती, बँकभरती, सरकारी नोकऱ्यांमधील भरती अशा वेगवेगळ्या नोकरभरतींमध्ये घोटाळे झाले असून तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. घोटाळेबाज बोम्मई सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक प्रचार करेल, असेही सुरजेवाला म्हणाले. बोम्मई सरकारचा भ्रष्टाचार हा काँग्रेसच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे सुरजेवाला यांनी सुचित केले आहे. राहुल गांधी मंगळवारी पूर्वाश्रमीच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून तिथे जाहीरसभेतून मतदारांशी संवाद साधतील. मात्र, त्यांचा कर्नाटक दौरा अजूनही अनिश्चित असून कोलारमधून ते काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात करणार होते. आत्तापर्यंत कोलारच्या सभेची तारीख तीनवेळा बदलण्यात आली आहे.