लखनऊ : लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला अतिआत्मविश्वासाचा फटका बसला असे मत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी व्यक्त केले. राज्यामधील ८० जागांपैकी ७० ते ७५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले असताना प्रत्यक्षात भाजपला ३३ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील भाजपची ही पहिलीच महत्त्वाची बैठक होती. त्यामध्ये पक्षाच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा >>> PM Narendra Modi X followers : पंतप्रधान मोदींचा अनोखा विक्रम; एक्सवर आता १० कोटी फॉलोअर्स, जागतिक नेत्यांना टाकलं मागे
राज्य कार्यकारिणी समितीला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजपने मागील निवडणुकीतील मतांची टक्केवारी कायम राखली असली तरी मते दुसऱ्या पक्षाकडे गेली आहेत. विरोधी पक्षांचा पराभव झाला असला तरी ते पुन्हा उड्या मारत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. ‘‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तर प्रदेशात २०१४, २०१७, २०१९ आणि २०२२ या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळाले. मात्र आपली हक्काची मते विरोधकांकडे गेल्यमुळे आणि अतिआत्मविश्वासामुळे भाजपला फटका बसला आहे,’’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले. लखनऊच्या राम मनोहर लोहिया राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या आंबेडकर सभागृहामध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची एका दिवसाची बैठक आयोजित करण्यात आली होती.