गेल्या ११ वर्षांत भाजपने उत्तर भारतात चांगले बस्तान बसविले असले तरी दिल्लीने भाजपला आतापर्यंत हुलकावणी दिली होती. यंदा दिल्ली विधानसभेतील विजयाने भाजपचे विजयाचे वर्तुळ पूर्ण झाले असले तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता आता ऑक्टोबरपर्यंत ताणली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत २०१४ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सत्ता मिळाल्यापासून उत्तर भारतात भाजपची घौडदौड सुरू झाली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड (२०१४मध्ये ) भाजपला या राज्यांमध्ये सत्ता मिळाली. बिहारमध्ये २०२० मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या पण मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच कायम राहिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत २०१५ आणि २०२० मध्ये भाजपचा धुव्वा उडाला होता. यामुळेच उत्तर भारतात भाजपला चांगले यश मिळाले असले तरी बिहार आणि दिल्ली या दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद अद्याप मिळू शकले नव्हते. यापैकी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने यंदा यश मिळविले आहे.

उत्तर भारतात बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे भाजपचे लक्ष्य आहे. बिहारची पक्षाची जबाबदारी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्याकडे आहे. यंदा पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यासाठी तावडे हे आधीपासूनच प्रयत्नशील आहेत. बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपला मिळाल्यास उत्तर भारतातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण होईल. तसेच उत्तर प्रदेश व महाराष्ट्रापाठोपाठ मोठे राज्य असलेल्या बिहारचे मुख्यमंत्रीपदही भाजपकडे येईल. गेल्या वेळी भाजपला ७५ तर नितीशकुमार यांना ४३ जागा मिळूनही भाजपने युतीचा धर्म पाळत नितीशकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कायम ठेवले होते. यंदा मात्र भाजप मुख्यमंत्रीपदाचे लक्ष्य समोर ठेवूनच रिंगणात उतरेल, अशी चिन्हे आहेत. गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारला झुकते माप देण्यात आले. बिहारसाठी जाहीर झालेल्या बहुतांशी तरतुदी या भाजपला यश मिळावे या उद्देशानेच जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील ४० पैकी ३० जागा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाल्या होत्या. त्यात भाजप आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला प्रत्येकी १२ जागा मिळाल्या. चिराग पासवान यांच्या पक्षाला ५ तर हिंदुस्थानी आवामला एक जागा मिळाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या इंडिया आघाडीला ९ जागा मिळाल्या. यापैकी राजदला ४, काँग्रेस तीन तर डाव्या पक्षांना दोन जागा मिळाल्या होत्या. पप्पू यादव हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. २०१९च्या तुलनेत भाजप आणि नितीशकुमार यांच्या आघाडीच्या जागा बिहारमध्ये २०२४ मध्ये घटल्या आहेत. यंदा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे आव्हान भाजप व नितीशकुमार यांच्यासमोर असेल. बिहार विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी भाजपची यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे.

तमिळनाडू आणि केरळ भाजपसाठी अजूनही दूर

उत्तर, पश्चिम, ईशान्य भारतात चांगले यश मिळविलेल्या भाजपला दक्षिण भारतात अजूनही बस्तान बसविता आलेले नाही. कर्नाटकची सत्ता दोनदा मिळाली. तेलंगणात पक्षाची कामगिरी सुधारली. आंध्र प्रदेशात यंदा सत्तेत भागीदारी मिळाली असली तरी पक्षाची फार काही चांगली कामगिरी झालेली नाही. तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये अनेक प्रयत्न करूनही भाजपला ताकद वाढविता आलेली नाही. तमिळनाडूतील द्रविडी राजकारणात भाजपचा अजून तरी निभाव लागलेला नाही.