मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १५२ हून अधिक तर महायुतीच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचे तर लोकसभेसाठी महायुतीच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक महाअभियान बैठकीत जाहीर केले आहे. भाजपच्या विधानसभेत बहुमताहून अधिक जागांचे उद्दिष्ट हे शिंदे – पवार गटासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. बहुमत मिळाल्यावर या घटकपक्षांचे महत्त्व भाजपच्या लेखी उरणार नाही आणि ते मिळविण्यासाठी भाजप शिंदे-पवार गटाला फारशा जागाही सोडणार नाही, हेच यातून अधोरेखित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी धरले असले, तरी त्यांच्या पक्षांची ताकद वाढविणे, ही भाजपची रणनीती नाही. भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळत नाही, अन्य पक्षांची मदत लागते, हे भाजप अनुभवातून शिकला आहे. शत्रूपक्षांना समोरासमोर लढून पराजित करताना आपलीही दमछाक होते. त्यापेक्षा हातमिळवणी करून एकमेकांत लढविले, तर ते कमजोर होतात, या चाणक्यनीतीने भाजप सध्या वाटचाल करीत आहे. त्यानुसारच ठाकरे-शिंदे गट आणि शरद पवार-अजित पवार गट यांना एकमेकांशी लढायला लावून भाजप स्वबळासाठी आपली ताकद वाढवीत आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल सरस, भाजपाची काय स्थिती? जाणून घ्या…

भाजप आपल्या वाट्याला येतील, त्यापैकी ८० टक्के जागा जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेत १५२ जागा जिंकण्यासाठी भाजपला किमान १८०-१८५ जागा लढवाव्या लागतील. त्यामुळे शिंदे-पवार गटाला एकूण २८८ पैकी १००-११० पर्यंत जागा भाजपकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्याबरोबर ५० तर अजित पवारांबरोबर ३२-४२ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना विद्यमान आमदारांपेक्षा अधिक जागा लढण्यासाठी मिळणार नाहीत, हेच भाजपने घटकपक्षांना सुचविले आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर भाजपची राज्यातील घटकपक्षांची गरज कमी होणार आहे. त्यामुळे त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे-पवार गटाला जागावाटपात फारसे महत्त्व देणार नाही. भाजपला विधानसभेत बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. त्यासाठी १५२ जागांचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. एकदा भाजपने बहुमत मिळविले, की मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील आणि शिंदे-पवार गटाचे फारसे महत्त्व उरणार नाही.

हेही वाचा – समान नागरी कायद्यामुळे हिंदूंचीही अडचण होईल; द्रमुक पक्षाकडून विधी आयोगाला पत्र

भाजप नेत्यांनी महायुतीच्या २०० हून अधिक जागा येतील, असे म्हटले आहे. शिंदे-पवार गटाचे सध्याचे संख्याबळ ८२-९२ इतके आहे. भाजपच्या १५२ जागांचे उद्दिष्ट असताना महायुतीच्या २४० हून अधिक जागांचे उद्दिष्ट असणे अपेक्षित आहे. पण भाजप नेत्यांनी २०० हून अधिकचा आकडा सांगितल्याने शिंदे-पवार गटाचे सध्याहूनही कमी आमदार निवडून येतील, असे अपेक्षित धरले आहे. भाजपने २५ वर्षांची युती असतानाही उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण केले, महादेव जानकर, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी पक्ष तर देशातही घटकपक्षांना फारसे महत्त्व दिले नाही. अन्य पक्षांची ताकद वाढविणे, हे भाजपचे उद्दिष्टच नाही. त्यामुळे भाजपचे विधानसभेसाठी १५२ हून अधिक जागांचे लक्ष्य हा शिंदे-अजित पवार गटाला सूचक इशाराच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp target of 152 seats is this a warning bell for shinde pawar print politics news ssb
Show comments