BJP Target Yusuf Pathan : केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनंतर ८ एप्रिलपासून सुधारित वक्फ कायदा देशभरात लागू झाला. मात्र, या कायद्याला पश्चिम बंगालमधून तीव्र विरोध करण्यात आला. मुर्शिदाबादमध्ये काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलने करून वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी २७० हून अधिक जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मुर्शिदाबादच्या हिंसाचारानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
युसूफ पठाणवर का होतेय टीका?
भाजपासह तृणमूल काँग्रेसच्या एका गटाने युसूफ पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. युसूफ पठाण हे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे बहरामपूरचे खासदार आहेत. त्यांचा मतदारसंघ हा मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे, तर उर्वरित दोन मतदारसंघांतही (जंगीपूर आणि मुर्शिदाबाद) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. दरम्यान, १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर युसूफ पठाण यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून चहा पितानाचे फोटो शेअर केले.
“सुस्त दुपार, चांगला चहा आणि शांत परिसर; फक्त क्षणात रमून जा” असं कॅप्शन पठाण यांनी त्यांच्या फोटोंना दिलं. त्यांच्या या पोस्टमुळे मोठा वादंग उठला. ४२ वर्षीय युसूफ यांना राज्यातील भाजपा नेत्यांनी लक्ष्य केलं. इतकंच नाही तर तृणमूल काँग्रेसमधील एका गटातील नेत्यांनीही पठाण यांचा खरपूस समाचार घेतला. जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना घडत असताना तुम्ही आपल्याच दुनियेत दंग आहात. खासदार महोदयांकडून लोकांना शांततेचं आवाहन का केलं जात नाही? असे अनेक प्रश्न भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केले.
आणखी वाचा : IND vs PAK : पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या ‘त्या’ विधानाचा भारताने कसा समाचार घेतला?
युसूफ पठाण यांचे मतदारसंघावर लक्ष नाही?
स्थानिकांच्या मते, खासदार असूनही पठाण यांचं जिल्ह्याकडे फारसं लक्ष नाही. ३१ मार्चला ईदपूर्वी ते बहरामपूरमध्ये आले होते. रमजान महिन्यात त्यांनी मुर्शिदाबादमधील तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या काही इफ्तार पार्टींमध्ये सहभाग घेतला होता. काहींच्या मते, युसफू पठाण यांनी जर तरुणांना शांततेचं आवाहन केलं असतं, तर मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या नसत्या. जिल्ह्यात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधिकच बळ मिळालं असतं.
खासदार युसूफ पठाण यांच्या जिल्ह्यातील अनुपस्थितीमुळे तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सत्ताधारी पक्षाने हिंसाचारग्रस्त भागांमध्ये अनेक शांतता बैठका घेऊन आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकांमध्ये मुर्शिदाबादचे खासदार अबू ताहेर खान आणि जंगीपूरचे खासदार खलीलुर रहमान यांच्यासह स्थानिक आमदारही उपस्थित होते. मात्र, युसूफ पठाण बैठकीला अनुपस्थित राहिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
‘युसूफ पठाण बैठकीलाही हजर राहत नाहीत’
“युसूफ पठाण हे राजकारणात नवीन असून त्यांनी आतापर्यंत पक्षातून बाजूलाच राहणं पसंत केलं आहे, पण त्यांच्या या कृतीमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे. आमचे खासदार, आमदार आणि अगदी बूथ कार्यकर्तेही मैदानात उतरले असून सर्वांना शांततेचं आवाहन करीत आहेत. शमशेरगंजमध्ये एक शांतता बैठक झाली होती, मी तिथे पोहोचण्यासाठी १०० किमी प्रवास केला. खलीलुर रहमान आणि टीएमसीचे अनेक आमदारही उपस्थित होते, पण युसूफ पठाण तिथे नव्हते,” अशी खंत तृणमूलचे खासदार अबू ताहेर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केली.
‘युसूफ पठाणची वरिष्ठांकडे तक्रार करणार’
युसूफ पठाण यांच्यावर टीका करताना, भरतपूरचे तृणमूलचे आमदार हुमायून कबीर म्हणाले, “तो एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे आणि गुजरातमध्ये राहतो. लोकांनी मतं देऊन त्याला निवडणुकीत विजय मिळवून दिला, पण आता हा गृहस्थ मतदारांसोबत खेळ खेळतोय. त्याचं वागणं अगदी मनमानी आहे.” कबीर पुढे म्हणाले, “युसूफ पठाण खासदार होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं. जर त्याने आपलं वागणं बदललं नाही आणि जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही तर मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्याच्याविरोधात तक्रार करणार आहे. पुढच्या वेळी त्याला उमेदवारी मिळू नये यासाठी मी प्रयत्न करेन. तो अशा संकटांच्यावेळी जनतेबरोबर उभा राहत नाही.”
भाजपाने युसूफ पठाणवर काय टीका केली?
राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही दंगलग्रस्त जिल्ह्यातील युसूफ पठाण यांच्या अनुपस्थितीवर टीका केली. भाजपाच्या बहारामपूर शाखेचे अध्यक्ष मोलॉय महाजन म्हणाले, “लोकसभा निवडणूक युसूफ पठाणसाठी जणू आयपीएलसारखी होती. सामना जिंकला आणि त्याचं काम संपलं. आता तो मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहत नाही. आम्हाला माहिती होतं की असंच काहीतरी होणार आहे. त्याला इथे राहायचंच नव्हतं. ज्यांनी त्याला मत दिलं, त्यांनीच आता त्याला प्रश्न विचारायला हवेत आणि ते विचारत आहेत.”
हेही वाचा : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची ‘या’ तारखेला होणार निवड? बैठकीत काय चर्चा झाली?
टीएमसीने घेतली युसूफ पठाणची बाजू
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने अधिकृतपणे पठाण यांची बाजू घेतली आहे. हिंसाचार घडलेली ठिकाणं त्यांच्या मतदारसंघात येत नाहीत, असं पक्षाने ठामपणे सांगितलं आहे. टीएमसीचे मुर्शिदाबाद जिल्हाध्यक्ष अपूर्व सरकार म्हणाले, “घटना बहरामपूरबाहेर घडली आहे. जर कुठे काही घडलं तर प्रत्येक ठिकाणी युसूफ पठाण यांनीच जायला हवं का? विरोधक मुद्दामहून त्यांना लक्ष्य करीत आहेत. आम्ही सगळे आमच्या भागांमध्ये काम करत आहोत, बूथ कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहोत. टीएमसी वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आहे आणि आम्ही संसदेत त्याविरोधात मतदान केलं होतं,” असं ते म्हणाले.
युसूफ पठाण राजकारणात कसे आले?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत युसूफ पठाण हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बहरामपूरचे पाचवेळचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा तब्बल ८५ हजार ०२२ मताधिक्यांनी पराभव केला. बहारामपूर शहरातील टेक्स्टाईल महाविद्यालयाजवळील चौकातील कार्यालयावर युसूफ पठाण यांचा भलामोठा फोटो असलेला फलक लावण्यात आलेला आहे. शहरातील एका तरुणाने सांगितले की, “खासदार म्हणून अधीर चौधरी यांची एक वेगळी प्रतिमा होती. पण, युसूफ पठाण तरुणांना भावला आणि त्यामुळे तो जिंकला. खासदारांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मतदारसंघात फिरलं पाहिजे, मात्र युसूफ पठाण इथे फारसे दिसत नाहीत.” सध्या मुर्शिदाबादमध्ये तणावपूर्व शांतता आहे, त्यामुळे युसूफ पठाण जिल्ह्याचा दौरा करून तरुणांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.