प्रख्यात वीरशैव लिंगायत संत आणि शिरहट्टी फकिरेश्वर मठाचे फकिरा डिंगलेश्वर स्वामी यांनी आगामी लोकसभा निवडणूक कर्नाटकातील धारवाड भागातून अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवरील भाजपा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधत लिंगायत संतांनी वीरशैव लिंगायत आणि इतर समुदायांना दडपण्याचा अन् सत्तेत राहण्यासाठी लिंगायत मठाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ‘मी धारवाड लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून माझी उमेदवारी जाहीर करीत आहे. राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे आणि धारवाड मतदारसंघ आणि परिसरातील लोकांना असे वाटते की, दोन्ही पक्ष ‘मॅच फिक्सिंग’सारखे ‘इलेक्शन फिक्सिंग’ करीत आहेत, असाही डिंगलेश्वर स्वामी यांनी आरोप केला. संतांच्या घोषणेनंतर भाजपाचे उमेदवार जोशी म्हणाले, ‘डिंगलेश्वर स्वामींवर कोणीही प्रतिक्रिया व्यक्त करू इच्छित नाही, ते जे काही बोलतात ते माझ्यासाठी आशीर्वादासारखे आहे. काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर लिंगायतांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि समाजातील सक्षम नेत्यांना योग्य पदे न दिल्याचा आरोपही डिंगलेश्वर स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
त्यामुळेच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि कोळसा आणि खाण मंत्री असलेल्या प्रल्हाद जोशी यांच्यासाठी डिंगलेश्वर स्वामी ही मोठी डोकेदुखी ठरत आहेत. एका पत्रकार परिषदेत डिंगलेश्वर स्वामी म्हणाले की, जोशी २० वर्षे खासदार असताना विकासकामांच्या बाबतीत ते शून्य आहेत. इतर समाज अन् नेत्यांना वळवण्यात ते हुशार आहेत. कुरुबा, रेड्डी, जंगमा आणि इतर यांसारख्या समुदायांची उपेक्षा करताना भाजपाने प्रल्हाद जोशी, बंगळुरू दक्षिणेतील तेजस्वी सूर्या आणि उत्तरा कन्नडमधील विश्वेश्वर हेगडे कागेरी या तीन ब्राह्मणांना उमेदवारी कशासाठी दिली, असा सवालही डिंगलेश्वर स्वामींनी उपस्थित केलाय. खरं तर जोशी यंदा पाचवी लोकसभा निवडणूक जिंकू पाहत आहेत. त्यांच्या चार विजयांपैकी तीन विजय धारवाडमधील आहेत, तर एक विजय हा धारवाड उत्तरेकडच्या मतदारसंघात झाला होता, जो २००८ च्या सीमांकनानंतर नाहीसा झाला.
हेही वाचाः बहुजन विकास आघाडीमुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होणार
स्वामींच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे. दोन दशकांहून अधिक काळ पक्षाने या जागेवर वर्चस्व राखले आहे, तरीही ते धारवाड जिंकू शकतील का? याबाबत भाजपाला शंका आहे. या स्पर्धेत डिंगलेश्वर सामील होण्याने वीरशैव लिंगायत मतांमध्ये संभाव्य फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे धारवाडला धार मिळेल. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जोशी काँग्रेसच्या विनय कुलकर्णी यांच्या विरोधात विजयी झाले होते. २०१४ मध्ये १.११ लाख मतांचे अंतर असताना २०१९ मध्ये जोशी यांनी २.०५ लाख मतांनी विजय मिळविला. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना तिकीट नाकारल्याचा संदर्भ म्हणून प्रदेशातील लिंगायत नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात जोशींची भूमिका महत्त्वाची होती. शेट्टर यांनी हुबळी-धारवाड सेंट्रल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसने त्यांना आमदार बनवले असताना ते आता बी. एस. येडियुरप्पा यांच्या आशीर्वादाने भाजपामध्ये परतले आहेत आणि आता बेळगाव लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार आहेत.
हेही वाचाः धुळ्यात काँग्रेसमधून डाॅ. शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत
डिंगलेश्वर स्वामींनी भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांचा मुलगा के. ई. कांतेश यांना हवेरी लोकसभेचे तिकीट न मिळाल्याबद्दल जोशी यांच्याकडे बोट दाखवले. जोशी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पक्षाने या जागेवरून उमेदवारी दिली आहे. भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांनी बंडखोरी करत शिमोगामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. डिंगलेश्वर स्वामी यांनी वीरशैव पंथांवर जोर देऊन लिंगायतांसाठी ओबीसी आरक्षणाची दीर्घकाळापासूनची मागणीही मांडली. भाजपा आणि काँग्रेस या दोघांनीही वीरशैव लिंगायतांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप डिंगलेश्वर स्वामी करीत असताना त्यांनी समाजातील सदस्यांना केंद्र सरकारमध्ये प्रमुख पदे न दिल्याबद्दल भाजपावर टीका केली. “कर्नाटकमधून नऊ वीरशैव लिंगायत खासदार निवडून आले असले तरी कोणालाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले नाही. त्यांना फक्त केंद्रीय राज्यमंत्री करण्यात आले होते,” असंही ते म्हणालेत. स्वार्थ साधण्यासाठी भाजपा मठांचे राजकीय केंद्र बनवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खरं तर डिंगलेश्वर स्वामींचे मठ हे प्रदेशातील संस्कृती टिकवून ठेवण्यासाठीचं केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यांनी आधी येडियुरप्पांनाही पाठिंबा दिला होता. जेव्हा २०२१ मध्ये येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले, तेव्हा त्यांनी येडियुरप्पांच्या अश्रूंनी भाजपा धुवून जाईल, असेही म्हटले होते.