भाजपापासून ते काँग्रेसपर्यंत, मंत्र्यांपासून ते शेतकरी नेत्यांपर्यंत आणि राजस्थानपासून ते हरियाणापर्यंत, पक्ष आणि राज्याच्या सीमा ओलांडत प्रत्येकजण लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुसेवाला यांच्या कुटुंबियांची नुकतीच राहुल गांधी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी म्हणाले की ” सिद्धू मुसेवाला यांचे कुटुंबीय ज्या दुःखातून जात आहेत त्याचे वर्णन करणे कठीण आहे. त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते पार पाडू. त्यांनी पंजाबमधील ‘आप’ सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पंजाबमध्ये शांतता आणि सलोखा राखणे आप सरकारच्या पलीकडे आहे”
शुभदीप सिंग सिद्धू मुसेवाला यांनी यावर्षी झालेली पंजाब विधानसभा निवडणुक लढवली होती. ते मासना या मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार होते. ‘आप’च्या विजय सिंगला यांनी मुसेवाला यांचा पराभव केला होता. अंत्यसंस्काराच्या वेळी सिद्धू यांच्या पार्थिवावर काँग्रेसचा झेंडा ठेवण्यात आला होता.
सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, माजी खासदार प्रनीत कौर, अकाल तख्तचे प्रमुख हरप्रीत सिंग यांचा समावेश होता. मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेट देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत आणि काँग्रेस सचिन पायलट यांचा समावेश आहे.
पंजाबमधील इतर प्रमुख नेत्यांमध्ये एसएडीचे सुखबीर बादल आणि हरसिमत कौर बादल, नुकतेच काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले सुनील जाखर, भाजपा नेते अश्विनी शर्मा आणि शेतकरी नेते गुरनाम चदुनि आणि जगजीत सिंग डल्लेवाल हे होते. एका बाजूला मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग लागली असताना पंजाबमधील “आप’च्या नेत्यांची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवते. मुसेवाला यांची हत्या झाली ते मानसा गाव मुख्यमंत्री भगवंत मान प्रतिनिधित्व करत असलेल्या संगरूर या लोकसभा मतदार संघात येतो.
अंत्यसंस्काराच्या दिवशी मुसेवाला यांच्या कुटुंबियांना भेट देणारे आप चे आमदार कुवर विजय प्रताप सिंग हे आम आदमी पक्षाचे पहिले नेते होते. भगवंत मान यांनी हत्येच्या पाच दिवसानंतर ‘मानसा’ला भेट. यावेळी गावात कडक सुरक्षा व्यवस्था तौनात करण्यात आली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.