Bihar Vidhan Sabha Election 2025 : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठं अपयश आलं. दशकभरापासून केंद्रात एकहाती सत्ता राखणाऱ्या पक्षाला २०२४ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकून भाजपानं जोरदार पुनरागमन केलं. इतकंच नाही, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सत्तेतून बाजूला सारून भाजपानं तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सत्ता स्थापन केली. आता या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभआ निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेन.

अमित शहांनी कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या?

बिहारची निवडणूक भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अत्यंत खडतर असण्याची शक्यता आहे. कारण, राज्यातील वाढते स्थलांतर, बेरोजगारी आणि इतर विविध मुद्द्यांवरून नितीश कुमार सरकारला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. हीच बाब लक्षात घेता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (तारीख ३० मार्च) बिहारचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाच्या ८४ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये पक्षातील कार्यकर्ते त्यांना साह्य करणार आहेत.

आणखी वाचा : भाजपामधील मतभेद चव्हाट्यावर? दिग्गजांमध्ये का उडताहेत खटके?

बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवणार?

भाजपाच्या राज्य नेतृत्वाशी संवाद साधताना शहा म्हणाले की, पक्षाला अशा बूथवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, जिथे भाजपाचे पारंपरिक मतदार नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही पक्षाने याच मॉडेलचे अनुसरण केले. त्यामुळे तेथील मतदारांच्या आकडेवारीत फरक दिसून आला. भाजपानं असंच काहीसं केलं होतं, ज्यामुळे पक्षाला मोठा फायदा झाला होता. राज्यात बूथ व्यवस्थापन आणि लाभार्थी व्यवस्थापन, तसेच लाभार्थी (कल्याणकारी) योजनांची अंमलबजावणी ही भाजपच्या निवडणूक यशाची गुरुकिल्ली आहे, असंही केंद्रीय गृहमंत्र्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

पंतप्रधान मोदीही देणार बिहारला भेट

विशेष बाब म्हणजे अमित शहा यांनी बिहारमधील भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर सलग दोन दिवस बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एकजुटीवर भर दिला, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा वारंवार उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत जवळजवळ दर महिन्याला राज्याचा दौरा करतील, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं.

दोन्ही बैठकांना उपस्थित असलेल्या एका भाजपा नेत्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, अमित शहा यांनी घेतलेल्या दोन्ही महत्त्वाच्या बैठकांतला सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष हा बिहारची निवडणूक जिंकणे आणि राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणे होता. २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याआधी बिहारची निवडणूक जिंकणे एनडीएसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कारण- या निवडणुकीमुळे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बळकटी मिळेल.

शहांच्या बैठकीनंतर भाजपा नेते काय म्हणाले?

भाजपाच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, सूक्ष्म पातळीवर बूथ व्यवस्थापन म्हणजे बूथनिहाय निकालांचा अभ्यास करणं. त्याचबरोबर स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना आयुष्मान भारत, पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि पंतप्रधान आवास योजना यांसारख्या फायदेशीर योजना राबवण्यास भाग पाडून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणं. बैठकीत अमित शहा भाजपा पदाधिकाऱ्यांना म्हणाले, “महाराष्ट्रातील २१ टक्के बूथवर पक्षाला अतिरिक्त मतं मिळाली आहेत, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुनरागमन करण्यास मदत झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं जोरदार पुनरागमन केलं. बिहारमध्येही आपण हेच ध्येय ठेवलं पाहिजे. एनडीएमधील घटक पक्षांनी एकजूट दाखवली, तर विधानसभा निवडणुकीत आपला सहज विजय होईल.”

हेही वाचा : गौतम अदाणींनी घेतली हेमंत सोरेन यांची भेट; भाजपा आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?

बिहार दौऱ्यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाटणा येथे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या ८०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर शहा यांनी गोपाळगंज येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. आपल्या भाषणातून केंद्रीय गृहमंत्र्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (RJD) लक्ष्य केलं.

बिहारमध्ये ‘जंगलराज’वरून राजकारण तापणार?

१९९० ते २००५ या काळात बिहारमध्ये ‘जंगल राज’ होतं, अशी टीका शहा यांनी केली. विशेष बाब म्हणजे, फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही बिहारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनीही आरजेडीवर ‘जंगलराज’वरून जोरदार टीका केली होती. आगामी काळात भाजपा नेतेही याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात लवकरच आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी पाहायला मिळतील, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्रिपद भाजपाचे पुढील लक्ष्य

गेल्या ११ वर्षांत भाजपानं उत्तर भारतात चांगलं बस्तान बसविलं आहे. मात्र, तरीही बिहारच्या मुख्यमंत्रिपदानं पक्षाला हुलकावणी दिली आहे. बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपाला मिळाल्यास उत्तर भारतातील पक्षाच्या सत्तेचं वर्तुळ पूर्ण होईल. सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे आणि काँग्रेस, आरजेडी व डाव्या विचारसणीचे पक्ष विरोधी गटात आहेत. महाराष्ट्र, हरियाणा व दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयामुळे निर्माण झालेल्या गतीवर स्वार होऊन, एनडीएनं बिहारमधील २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधात असलेल्या आरजेडी आणि काँग्रेसनंही बिहारच्या निवडणुकीवर आतापासूनच लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.