उमाकांत देशपांडे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचा विचारविनिमय व अटीशर्ती निश्चित केल्या जात आहेत. महाराष्ट्रात भाजपची ताकद कितीही वाढली तरी एकहाती सत्ता मिळूच शकत नाही, हे ओळखलेल्या भाजपला आता ‘ ठाकरे ‘ हे आडनाव असलेल्या नेत्याची गरजही भासत असल्याने राज ठाकरे यांच्याबरोबर राजकीय वाटाघाटी होत आहेत.
महाराष्ट्रात कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्वबळावर सत्ता मिळू शकत नाही, हे गेल्या ३०-४० वर्षातील राजकीय वास्तव आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर युती केली व ती पुढे ३० वर्षे टिकली. भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता मिळाली आणि राज्यातही ताकद वाढली. त्यामुळे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडण्यात आली व स्वबळ अजमावले गेले. पण अंदाज चुकला आणि बहुमत न मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी करून घ्यावे लागले.
हेही वाचा >>> अयोध्येत रामाचे, तर सीतामढीत सीतेचे मंदिर; जमीन अधिग्रहणाला बिहार सरकारची मंजुरी!
ठाकरे यांच्याबरोबरचे नाते २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून तुटले आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर वेगळी चूल मांडली. त्याचा राजकीय सूड घेत भाजपने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून तर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून फोडले आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मूळ पक्षही बहाल केले.
भाजपबरोबर आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे मोठे पक्ष असूनही एकही खासदार नसलेल्या व एकमेव आमदार असलेल्या मनसेसारख्या पक्षालाही महायुतीत घेण्याची गरज भाजपला सध्याच्या राजकीय परिस्थितीत भासत आहे. मनसेने सुरूवातीला १३ आमदार कमावले होते, मात्र कालौघात हे बळ सरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे हे त्यांचे व भाजपचे गोडवे गाऊ लागले. भाजपला उपयुक्त किंवा भाजपविरोधकांवर विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडू लागले. तेव्हा मनसे ही भाजपची ब गट (बी टीम) असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
हेही वाचा >>> मुद्दा महाराष्ट्राचा- उत्तर महाराष्ट्राची प्रश्नपत्रिका…
मनसेने गेल्या काही वर्षात अनेक विषयांवर भाजपला पूरक व अनुकूल भूमिका घेतली असून फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांनी गेल्या काही काळात राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेऊन हे स्नेहसंबंध दृढ केले. शिंदे व पवार बरोबर असताना आणि राज ठाकरे यांचे छुपे सहकार्य असतानाही सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपला राज ‘ ठाकरे ‘ हे नाव उघडपणे बरोबर असावे असे वाटत आहे. उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपने शिवसेना फोडली व युतीत दगा केल्याचा प्रचार करीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची व जनतेचीही खूप सहानुभूती होती. ठाकरे आताही जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे शिवसेना फोडल्याची सहानुभूती व त्याचा राजकीय फायदा उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत होऊ नये, हा भाजपचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांना युतीत घेण्यापेक्षा अनुकूल भूमिकेत स्वतंत्र ठेवणे, भाजपला अधिक उपयुक्त वाटत होते. तरीही ‘ ठाकरे ‘ या आडनावाची पोकळी शिंदे भरून काढू शकत नसल्याने राज ठाकरे यांना उघडपणे बरोबर घेण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्याच राज ठाकरे यांची भूमिका ठरविली जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.