माहिती आधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांचा आधार घेत आरोप करण्याच्या कार्यशैलीतील ‘अग्रेसर’ असणारे भाजपचे किरिट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात बांगलादेशी मुस्लिम आले आहेत व त्यांना चार हजार ७३० बनावट जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला. सिल्लोडमध्ये असे सर्वाधिक अर्ज आले. याच तालुक्यातून त्यांना जन्म प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. या आरोपाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही दुजोरा दिला असून केवळ सिल्लोडच नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातही बांगलादेशी मुस्लिम असावेत त्यामुळे त्याचे सर्वेक्षण केले जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हा नवा मुद्दा महापालिका निवडणुकीमध्येही केंद्रस्थानी असू शकतो, अशी चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशी वास्तव्याच्या प्रकरणामुळे शहरात नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. या नव्या कारवाईमुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपसह ‘एमआयएम ’या तिन्ही पक्षांना निवडणुकीत नवा मुद्दा मिळाला आहे. दरम्यान प्रशासकीय पातळीवर आता जन्म- मृत्यूचे दाखले देण्याची कारवाई सिल्लोड तालुक्यात स्थगित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील समस्यांपेक्षाही मतपेढीमध्ये ‘ हिंदू – मुस्लिम ’ हाच भेद केला जात होता. पूर्वी ही प्रक्रिया उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक नेते मंडळी करत होते. आता मुस्लिम विरोधाचा आवाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक नेते व कार्यकर्ते करत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट , जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ ही मंडळी हिंदूत्त्वाचा झेंडा उंचावत असल्याचे कार्यक्रम आखत आहेत.

शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त क्रांती चौकातून हिंदू जनजागणरण महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ठाकरे गटातील नेत्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक वर्षे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासमवेत राहणारे माजी महापौर नंदकुमार घोडले, त्यांच्या पत्नी अनिता घोडले अशा अनेक नेते मंडळीनी पक्षांतर केले. महापालिका निवडणुकीसाठी पक्षांतरचा खेळ आता पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी चंद्रकांत खैरे यांनी वार्डनिहाय बैठका घेण्याचा सुरू केला असला तरी पक्षांतर रोखण्यात उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वादामुळे पक्षात पुढचे स्थान मिळण्यास अडचणी असल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत. अगदी जाहीर कार्यक्रमातही तुमचे वाद मिटवा तर पुढे जाता येईल असेही काही कार्यकर्त्यांनी सुनावले आहे. अशा राजकीय परिस्थितीमध्ये बांगलादेशी मुस्लिम हा मुद्दा किरिट सोमय्या यांनी चर्चेत आणल्याने महापालिका निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to raise bangladeshis issue in chhatrapati sambhajinagar municipal corporation elections print politics news zws