BJP : नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला काही राज्यात मोठा फटका बसला होता. २०१९ च्या तुलनेत अनेक राज्यात भाजपाच्या जागांची संख्या घटली होती. परिणामता २०१९ मध्ये स्वबळावर सत्ता मिळवण्याऱ्या भाजपाला यंदा बहुमताचा आकडाही पार करता आला नाही. या निडणुकीत दलितांबरोबरच अल्पसंख्याक मतदार भाजपापासून दूर गेल्याने भाजपावर ही परिस्थिती ओढवली, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली. त्यापार्श्वभूमीवर आता भाजपाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.
१ सप्टेंबरपासून भाजपाचे राष्ट्रीय सदस्यत्व नोंदणी अभियान सुरू होणार आहे. याअंतर्गत ५० लाख अल्पसंख्याक सदस्यांची नोंदणी करण्याचं लक्ष्य भाजपाने ठेवलं आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या मुख्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी दुष्यंत कुमार गौतम आणि राज्य प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याद्वारे अल्पसंख्याक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असं बोललं जात आहे.
हेही वाचा – नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसमध्ये आघाडी; जम्मू आणि काश्मीरमधील सर्व ९० जागांचे वाटप लवकरच
यासंदर्भात द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना भाजपाच्या अल्पसंख्यक मोर्चाचे प्रमुख जमाल सिद्धीकी म्हणाले, आम्ही अल्पसंख्यक समुदायातील ५० लाख सदस्य भाजपाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. याशिवाय २७ ऑगस्ट रोजी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी दुष्यंत कुमार गौतम उपस्थित राहणार आहेत.
भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जोजो जोस यांची सदस्यत्व नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय निसार हुसेन शाह, मौलाना हबीब हैदर, फहीम सैफी, मोहम्मद सद्दाम आणि जफरीन महजबीन हे सहप्रभारी असणार आहेत. या कार्यशाळेद्वारे पक्षातील सदस्यांना मिस्ड कॉल, क्यूआर कोड, नमो वेबसाइट आणि भाजपाची अधिकृत वेबसाइट याद्वारे सदस्य नोंदणी करायची, याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
खरं तर अल्पसंख्यक समाज हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाही. भाजपाकडून अल्पसंख्यक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून या कार्यशाळेकडे बघितलं जात आहे. पसंमदा मुस्लीम समुदायाकडून पाठिंबा मिळवण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर ही कार्यशाळा होत असल्याने याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी भाजपाने अशाचप्रकारे अल्पसंख्यकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुफी संवाद यात्रा आयोजित केली होती.
हेही वाचा – राजकारण सोडणार नाही, नवा पक्ष काढणार – चंपाई सोरेन
महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केरळमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्यकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फायदाही भाजपाला झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने केरळमध्ये खातं उघडत पहिला विजय नोंदवला. भाजपाचे उमेदवार सुरेश गोपी हे त्रिशूर मतदार संघातून निवडून आले. त्यामुळे अशा प्रकारे अल्पसंख्यक मतदारांपर्यंत पोहोचल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना आहे.
दुसरीकडे या सदस्यत्व नोंदणी अभियानामुळे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबरोबरच संघटनात्मक पातळीवरील निवडणुकीच्या मार्गही मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाच्या संविधानात अर्धा पेक्षा जास्त राज्यांच्या प्रमुखांची नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक घेता येते, अशी तरदूत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपला आहे. त्यामुळे पक्षाद्वारे त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
© IE Online Media Services (P) Ltd