उमाकांत देशपांडे लोकसत्ता
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी होणार आहे. त्यामुळे त्यांना थेट अजित पवार गटात सामील करून घेण्यापेक्षा त्यांचे छुपे सहकार्य मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मलिक यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी मुंबई बाँबस्फोटातील आरोपीकडून स्वस्त दरात मुंबईतील जमीनखरेदी केली होती. त्यांचे देशाविरोधात अतिरेकी कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांशी आर्थिक हितसंबंध होते, असा आरोप ठेवून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती. त्याकाळात विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी विधिमंडळात आणि पत्रकारपरिषदांमधून मलिक यांच्यावर आरोपांचे काहूर उठविले होते. कुख्यात दाऊद इब्राहिम आणि देशविरोधी कृत्ये करणाऱ्यांशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार होते, असे आरोप करण्यात आले होते आणि अशा व्यक्तींशी भाजप कधीही राजकीय संबंध ठेवणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले होते. ईडीसह अन्य केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अजित पवार, छगन भुजबळ, प्रताप सरनाईक व अन्य नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपला सत्तेत सहकार्य केल्याने त्यांची चौकशीच्या फेऱ्यांमधून सुटका झाली आहे.
हेही वाचा >>> राज्यात काँग्रेसची पुन्हा यात्रा
मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व सुमारे दीड वर्षे तुरूंगात असलेल्या मलिक यांच्या वैद्यकीय जामीनास ईडीने सर्वोच्च न्यायालयातही आधी कडाडून विरोध केला होता. त्यामुळेच उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला नव्हता. पण अजित पवार गट भाजपबरोबर सत्तेत आल्यावर ईडीने न्यायालयात मौन बाळगून मलिक यांच्या जामीनास विरोध केला नाही. ईडीच्या या भूमिकेबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काही नेत्यांनी आश्चर्य व्यक्त करून मलिक यांना विशिष्ट राजकीय भूमिका घेण्यास भाग पाडले जाईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी मलिक हे अजित पवारांबरोबर जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> जिल्हा आणि तालुका निर्मितीचे पुन्हा राजकारण आणि आंदोलने
मात्र मलिक हे उघडपणे अजित पवारांबरोबर आल्यास भाजप नेत्यांबरोबर व्यासपीठावर किंवा अन्यत्र एकत्र बसल्यास भाजपची चांगलीच राजकीय पंचाईत होईल. गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या नेत्यांची भाजपबरोबर आलेल्या नेत्यांची चौकशीतून सुटका होते, याबाबत भाजपवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे मलिक अजित पवार गटामार्फत भाजपबरोबर आल्यास या टीकेला पुष्टीच मिळणार आहे. पवार गटाने मंत्रीपद किंवा सत्तेतील एखाद्या पदासाठी मलिक यांचे नाव सुचविल्यासही अडचण होईल. त्यामुळे मलिक यांचा उघडपणे अजित पवार गटात प्रवेश होण्यापेक्षा त्यांचे छुपे सहकार्य घेण्याचा भाजपचा प्रयत्न राहण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपसाठी लोकसभेसाठी प्रत्येक जागा महत्वाची आहे. मलिक यांचा कुर्ला आणि अन्य पट्ट्यात प्रभाव आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघात आशिष शेलार, पराग अळवणी, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर हे भाजप व शिंदे गटातील आमदार असले, तरी काँग्रेस व ठाकरे गटाची या मतदारसंघातील ताकद, मुस्लिमांची चार लाखाहून अधिक असलेली मतदारसंख्या यामुळे महाजन यांना ही निवडणूक कठीण आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांचे छुपे सहकार्य मिळाल्यास महाजन यांच्या निवडणुकीला उपयोग होईल. त्यामुळे मलिक यांनी भाजपसह सत्तेत असलेल्यांवर जाहीर टीका टाळून निवडणुकीसाठी छुपे सहकार्य केल्यास त्यांची अडचणींमधून सुटका होईल, अशी शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.