नागपूर – विधान परिदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून एकूण पाचपैकी दोन जागा या खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या जागांवर उमेदवार देताना दोन्ही उमेदवार नागपूरचे दिले जाणार की एक नागपूर आणि दुसरा विदर्भातून दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे कामठी आणि मध्य नागपूरमधून विजयी झाले. त्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वरील दोन जागांसह एकूण पाच रिक्त पदांसाठी नुकतीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. पाचपैकी प्रत्येकी एक जागा शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांना तर तीन जागा भाजप लढवणार आहे. तीनपैकी दोन जागा नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे उमेदवार ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय महत्त्वाचा असेल. दरम्यान रिक्त दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. जी नावे चर्चेत आहेत, त्यात प्रांमुख्याने गडकरी समर्थक माजी आमदारव्दय सुधाकर कोहळे, अनिल सोले व मुख्यमंत्र्यांचे स्नेही व माजी महापौर संदीप जोशी यांच्या नावांचा समावेश आहे.

२०२० मध्ये झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी यांना भाजपने संधी दिली होती. तत्कालीन आमदार अनिस सोले यांची उमेदवारी कापून जोशी यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असतानाही पक्षांतर्गत वादामुळे जोशी यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे दटकेंच्या जागेवर जोशी यांच्या नावाचा आग्रह फडणवीस यांच्याकडून धरला जाऊ शकतो. फडणवीस उपमुख्यंत्री झाल्यावर त्यांनी जोशी यांची उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जोशी हेच साभाळतात. त्यामुळे जोशी यांचे विधान परिषदेत जाण्याचे स्वप्न यावेळी फडणवीस पूर्ण करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तिकीट नाकारून पक्षाने माजी आमदार अनिल सोले यांच्यावर अन्याय केला, अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र सोले यांनी पक्षाचा निर्णय अंतिम माणून याबाबत आतापर्यंत कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. पक्षात प्रा. सोले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. यावेळी त्यांचे पुनर्वसन करण्याची संधी आहे. त्यामुळे गडकरी सोलेंच्या नावासाठी आग्रह करू शकतात. असे झाले तर बावनकुळे यांच्या जागेवर पक्ष सोलेंच्या नावाचा विचार करू शकते.

गडकरी समर्थक दुसरे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा त्यांना लगेच विधासभेवर पाठवण्याला विरोध होऊ शकतो. अशा वेळी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.