व्होट जिहाद’ आरोपातील फोलपणा उघड; मुस्लीमबहुल मतदारसंघांत भाजपच्याच मतांमध्ये वाढ

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. या निकालानंतर फडणवीस यांनी व्होट जिहादचा आरोप केला होता.

व्होट जिहाद’ आरोपातील फोलपणा उघड; मुस्लीमबहुल मतदारसंघांत भाजपच्याच मतांमध्ये वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’मुळे १४ मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी लोकसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघांतील मतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीच्या मतांमध्ये लोकसभा निवडणुकीत वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झाल्याचा आरोप करीत फडणवीस यांनी त्याला व्होट जिहादची उपमा दिली होती. २०११च्या जनगणनेनुसार राज्यातील मुस्लीम समाजाची लोकसंख्या ही १ कोटी ३० लाख असून, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ११.५६ टक्के आहे. राज्यातील ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यापैकी काही मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या ही ४० टक्क्यांच्या आसपास आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या ३८ पैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना (९), राष्ट्रवादी काँग्रेस (३), समाजवादी पार्टी आणि एमआयएम प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. मुस्लिमांची संख्या लक्षणीय असली तरी या ३८ मतदारसंघांमधून फक्त आठ मुस्लीम आमदार निवडून आले होते.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील वाद निवळला; चेन्निथला उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ वर; दोन दिवसांत जागावाटपाची घोषणा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. या निकालानंतर फडणवीस यांनी व्होट जिहादचा आरोप केला होता. परंतु मुस्लीमबहुल मतदारसंघांचा आढावा घेतल्यास ३८ पैकी २० मतदारसंघांमध्ये भाजप किंवा महायुतीच्या मतांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढ झालेली दिसते. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात गेल्या वेळी काँग्रेसचा आमदार निवडून आला होता. पण यंदा भाजपच्या उमदेवारांच्या मतांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे.

मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, औरंगाबाद मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या मतदारसंघांमध्ये मात्र महायुतीच्या मतांमध्ये २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १० टक्क्यांनी घट झाली आहे.

महायुतीच्या मतांमध्ये वाढ झालेले काही मुस्लीमबहुल मतदारसंघ

२०१९ विधानसभा २०२४ लोकसभा

मालेगाव मध्य ०.४२ टक्के २.२२ टक्के

धुळे ग्रामीण ४२.२५ टक्के ४५.२२ टक्के

वर्सोवा मुंबई ३३.९८ टक्के. ४१.३६ टक्के

वांद्रे पूर्व २५.७१ टक्के. ३७.५७ टक्के

मुंब्रा-कळवा १८.७९ टक्के ३२.६७ टक्के

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp votes percentage increase in muslim majority constituencies print politics news zws

First published on: 20-10-2024 at 06:41 IST
Show comments