एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : अलीकडे भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने आक्रमक पवित्रा घेत दोन्ही काँग्रेससह उद्धव ठाकरे शिवसेनेला सुरूंग लावण्याचा झपाटा चालविला आहे. सोलापूर जिल्ह्यात हेच चित्र दिसून येत असताना दुसरीकडे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र भाजप विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे विपरीत राजकारण पाहायला मिळत आहे. त्याचे पडसाद मोहोळसह शेजारच्या पंढरपूर तालुक्यात उमटत आहेत.
हेही वाचा… राहुल यांच्या यात्रेत महाराष्ट्रातून नऊ भारतयात्री
कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या ताब्यात असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या १३ नोव्हेंबर रोजी आहे. सत्ताधारी धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादीचे मोहोळ येथील माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्यासोबत एकत्र येऊन भीमा बचाव परिवर्तन आघाडीचे आव्हान उभे केले आहे. खासदार महाडिक यांनीही परिचारक व राजन पाटील यांच्या विरोधकांना आपल्याकडे खेचून आणले असून यात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील व इतर मंडळी राजन पाटील यांच्यावरील राग काढण्यासाठी महाडिक यांना साथ देत आहेत. यातूनच महाडिक यांच्या विरोधात परिचारक यांच्या रूपाने भाजप विरुद्ध भाजप आणि राजन पाटील यांच्या विरोधात उमेश पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे विपरीत चित्र पाहत असताना उभयतांमध्ये होणारे आरोप-प्रत्यारोप व शक्तिप्रदर्शनामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. यातील राजन पाटील हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा… भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य
भीमा सहकारी साखर कारखान्याची उभारणी खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबाने म्हणजे भीमराव महाडिक यांनी ५० वर्षांपूर्वी केली होती. मोहोळ व पंढरपूर तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला हा साखर कारखाना नंतर बंद पडला आणि नंतर महाडिक कुटुंबीयांच्या ताब्यातून दिवंगत नेते सुधाकर परिचारक यांच्या ताब्यात गेला होता. दहा वर्षे परिचारक व राजन पाटील गटाच्या वर्चस्वाखाली राहिलेला हा साखर कारखाना नंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून पुन्हा महाडिक गटाने खेचून घेतला होता. सलग दोन वेळा परिचारक व पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही महाडिक यांनी आपली ताकद टिकवून ठेवली आहे. स्वतः महाडिक व त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक हे निवडणूक रिंगणात आहेत. तर परिचारक यांचे विश्वासू सहकारी तथा पंढरपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या पत्नी अर्चना घाडगे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील आदींची उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे. महाडिक गटाच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या हस्ते फोडला गेला. त्यासाठी पाटील हे शिर्डी येथील राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर अर्धवट सोडून महाडिक यांच्या मदतीसाठी धावून आले. महाडिक व परिचारक हे दोघे भाजपमध्ये असूनही त्यांच्यात भीमा साखर कारखान्याच्या मुद्द्यावर विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. दिवंगत नेते सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांचे पूर्वीपासून मोहोळचे राजन पाटील-अनगरकरांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. तर याउलट राजन पाटील यांच्याच राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जनता दरबाराच्या नावाखाली मोहोळ तालुक्यात गाव दौरे करून राजन पाटील यांच्या विरोधात टीकास्त्र सोडण्याची मोहीम कायम ठेवली आहे. राजन पाटील हे शरद पवार गटाचे तर उमेश पाटील हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी ओळखले जातात. पक्षांतर्गत गटबाजीतून उमेश पाटील यांना आपल्या विरोधात जाणीवपूर्वक फूस लावून त्रास दिला असल्यामुळे राजन पाटील हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसह नक्षत्र डिस्टलरी प्रकल्पातील कथित गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीच शासनाने फौजदारी कारवाई केली आहे. यातून पाटील कुटुंबीयांना दिलासा हवा आहे.
हेही वाचा… Maharashtra News: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…
राजन पाटील हे १९९५ ते २००९ पर्यंत मोहोळचे आमदार होते. पुढे त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यांच्या वर्चस्वाखालील लोकनेते बाबुराव पाटील सहकारी साखर कारखाना अलीकडे खासगी झाला आहे. स्वतःचा सहकारी साखर कारखाना रातोरात खासगी करणाऱ्यांनी भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आव्हान देताना सहकार बचावाच्या बाता मारू नयेत, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला आहे. राजन पाटील यांच्या मुलांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्यांनी मर्यादेत राहून बोलावे, असेही महाडिक यांनी सुनावले आहे. तर राजन पाटील व त्यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील हे धनंजय महाडिक यांच्या भीमा कारखान्यातील गैरकारभाराचा पाढा वाचताना महाडिक यांच्यापासून भीमा कारखाना वाचविणे हे समस्त शेतकरी सभासदांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रचार सभांमधून सांगतात.