गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष यांच्यात विसंवाद व प्रसंगी विरोध निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावरून संघानं नाराजी व्यक्त केल्यानंतर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या ‘आता भाजपा स्वयंपूर्ण आहे’ या विधानामुळे या विसंवादाच्या चर्चेला आणखीन खतपाणी मिळालं. नुकतंच संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील आंबेकरांनी ‘हे कौटुंबि मुद्दे’ असल्याचं म्हणत वादाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. आता मध्य प्रदेशमध्ये या विसंवादाची चर्चा अधिक ठळक करणारी घटना समोर आली आहे.
भाजपाच्या अभियानाला अभाविपचा विरोध!
भारतीय जनता पक्षानं मध्य प्रदेशमध्ये सदस्य नोंदणीचं व्यापक अभियान राबवायला सुरुवात केली आहे. पण इंदौरमधील शासकीय महाविद्यालयातील या अभियानाला मोठा विरोध सहन करावा लागत आहे. मात्र, हा विरोध करणारे विरोधी पक्षाचे सदस्य नसून भाजपाची पालक संघटना मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच विद्यार्थी शाखा अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. “शिक्षणाची मंदिरं राजकारणाचा अड्डा बनू शकत नाहीत”, अशी भूमिका या संघटनेनं घेतली आहे.
“जब जब छात्र बोला है, राज सिंघासन डोला है” अशा घोषणा देत अभाविपच्या सदस्यांनी थेट इंदौरच्या शासकीय होळकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी इंदौरचे भाजपा आमदार गोलू शुक्ला व भाजपाचे इंदौर शहर अध्यक्ष गौरव रणदिवे यांनी मध्यस्थी केल्यानंतरही अभाविपच्या सदस्यांचं समाधान होऊ शकलं नाही.
अखेर प्राचार्यांनीच मानली हार!
अभाविपच्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर प्राचार्य सुरेश टी. शिलवत यांनीच माघार घेतली आणि यासंदर्भात लेखी आदेश जारी केला. अभाविपच्या सहमतीशिवाय महाविद्यालयाच्या आवारात कोणताही राजकीय उपक्रम घेतला जाणार नाही, असं त्यांना जाहीर करावं लागलं.
भाजपाचं लक्ष्य, प्रत्येक बुथवर १०० सदस्य नोंदणी!
भारतीय जनता पक्षानं मध्य प्रदेशमधल्या एकूण ६४ हजार ८७१ बुथवर प्रत्येकी १०० सदस्यांची पक्षात नोंदणी करून घेण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. मंगळवारी जेव्हा अभाविपचे विद्यार्थी वर्गांमध्ये बसले होते, तेव्हा त्यांनी सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात येताना पाहिले. यासंदर्भात अभाविपचा इंदौर शहर सचिव रितेश पटेलनं परिषदेची भूमिका स्पष्ट केली.
“आम्ही पाहिलं की काही भाजपा कार्यकर्ते सदस्य नोंदणी अभियान राबवत आहेत. आम्ही त्यांना हे असं का करत आहात? अशी विचारणा केली असता प्राचार्यांनी त्याची परवानगी दिल्याचं आम्हाला समजलं. आम्ही प्राचार्यांना विचारलं तर ते म्हणाले आम्ही त्यांना परवानगी नाकारू शकत नाही. मग आम्ही आंदोलनाचा मार्ग निवडला”, असं पटेलनं सांगितलं. “आम्ही प्राचार्यांना सांगितलं की आज भाजपा महाविद्यालयात आली आहे. उद्या दुसरा कुठलातरी पक्ष येईल. महाविद्यालय हे राजकारणाचा अड्डा नसून शिक्षणाचं मंदिर असायला हवं असं आम्ही त्यांना सांगितलं”, असं रितेश पटेलनं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
अभाविपचा दुसरा एक वरीष्ठ सदस्य म्हणाला, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भारतीय जनता पक्ष यांच्यात कदाचित विचारसरणीच्या बाबतीत साम्य असू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना महाविद्यालयाच्या आवारात येण्याची परवानगी देऊ. या सदस्य नोंदणी अभियानाच्या विरोधात आम्ही इतर चार महाविद्यालयांमध्येही आंदोलन केलं आहे. त्याशिवाय आम्ही इतर जिल्ह्यांमधल्या सदस्यांशीही समन्वय साधला असून अशा प्रकारचं सदस्य नोंदणी अभियान त्यांच्या महाविद्यालयातही चालू देऊ नये, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे”!
भाजपा म्हणते, गैरसमज दूर झाला आहे!
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे इंदौर व भोपाळमधील वरिष्ठ नेते मात्र निर्माण झालेला गैरसमज दूर झाल्याची भूमिका मांडताना दिसत आहेत. “अभाविप व भाजपा हे सारखेच आहेत. अभाविपनं आम्हाला विरोध केलेला नाही. आम्ही हा मुद्दा आता सोडवला आहे. काही कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात गेले असतील आणि त्यामुळेच गैरसमज निर्माण झाला असेल”, अशी प्रतिक्रिया आमदार गोलू शुक्ला यांनी दिली. तर शहर अध्यक्ष रणदिवे यांनी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी झाल्याचा दावा केला.
“इंदौरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला यश आलं असून जवळपास ५ लाख नवे सदस्य पक्षाशी जोडले गेले आहेत. इंदौरच्या महाविद्यालयात जे घडलं, तो एक गैरसमज होता. अभाविप महाविद्यालयाच्या आवाराच्या आत काम करते, तर आम्ही आम्ही बाहेर असतो. अभाविपला त्यांची स्वत:ची अशी भूमिका आहे. आम्ही सदस्य नोंदणी महाविद्यालयाच्या बाहेरच करू, हे त्यांना समजावून सांगण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे”, असं रणदिवे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.