नागपूर पदवीधर आणि शिक्षक हे दोन बालेकिल्ले गमावल्यानंतर भाजपाने आगामी महापालिका व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन नागपुरात निवडणूक तयारीसाठी ‘वॉर रूम’ तयार केली आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संगणक कक्षात विदर्भातील यापूर्वीच्या सर्व प्रमुख निवडणुकांची आकडेवारी संग्रहित असून, त्याचे विश्लेषण करून निवडणूक रणनीती तयार केली जाणार आहे.
विदर्भ भाजपचा बालेकिल्ला असला तरी त्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून धक्के लागणे सुरू झाले आहे. हक्काचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघही पक्षाने गमावले. पुढच्या काळात महापालिका व त्यानंतर एक वर्षाने लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. नागपूर महापालिकेवर भाजपाची १५ वर्षांपासून सत्ता आहे.(सध्या प्रशासक आहे.) नागपूर लोकसभेची जागाही पक्षाने सलग दोन वेळा गडकरी यांच्या रुपात प्रचंड मताधिक्क्याने जिकंली. त्यामुळे या दोन्ही निवडणुका जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. भाजपा हा ऐकमेव पक्ष आहे जो कायम निवडणुकीच्याच ‘मुड’ मध्ये असतो. विरोधी पक्षात असताना वेगवेगळ्या मुद्यांवर आंदोलन करून भाजपने कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवले होतो, आता पक्ष सत्तेत असला तरी विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा करून भाजपची आंदोलने सुरूच असतात. मात्र, तरीही पक्षाला मागच्या दोन निवडणुकीत अपयश मिळाले आहे. त्यामुळेच पुढील महापालिकेच्या निवडणुकीत धोका नको म्हणून पक्ष तयारीला लागला आहे. निवडणुकीला रणांगण मानणाऱ्या भाजपने निवडणूक नियोजनाच्या कक्षाला ‘वॉर रूम’ असे नाव दिले आहे. मागच्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या ‘वॉर रूम’चे उद्घाटन करण्यात आले.
अशी आहे वॉर रूम’
भाजपा कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या अत्याधुिनक वॉर रूम’मध्ये आठ संगणक आहेत. या संगणकाच्या माध्यमातून विदर्भातील आतापर्यंतच्या लोकसभा, विधानसभा, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, त्यात पुढच्या निवडणुकीत झालेली कमी-अधिक वाढ, बुथची संख्या, बुथ कर्मचाऱ्यांची संख्या बुथ निहाय मिळालेल्या मतांची संख्या यासह इतर सर्व बाबी ज्या निवडणूक विश्लेषणासाठी आणि त्यावर आधारित निवडणुका जिंकण्याच्या नियोजनासाठी कामी पडतात याची माहिती संग्रहित करण्यात आली आहे.
हेही वाचा – १७ वर्षांपासून शिवराज सिंह चौहान यांच्यावर का नाराज आहेत उमा भारती?
“भाजपाची वॉर रूम’ ही महापालिका निवडणुकीसाठी नव्हे तर निवडणुकीचा डेटा गोळा करून ठेवण्यासाठी तयार केली आहे. भाजपा नेहमीच निवडणुकीसाठी सज्ज असते. विश्लेषण, नियोजनासाठी या यंत्रणेची गरज भासते”, असे नागपूर येथील भाजप प्रवक्ते चंदन गोस्वामी म्हणाले.