West Bengal Lok Sabha Result पश्चिम बंगालमधील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळवून आश्चर्याचा धक्का देणार्या भाजपाला यंदा या यशाची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले आहे. राज्यातील ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) २९ जागा, तर भाजपाने केवळ १२ जागा जिंकल्या आहेत. भाजपाचे वाढते वर्चस्व रोखण्यात यंदा तृणमूल काँग्रेसला यश आले आहे. पश्चिम बंगालमधील अपयशामुळे आता भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील दोन प्रमुख नेत्यांनी राज्य नेतृत्वावर टीका केली आहे.
भाजपाच्या प्रमुख नेत्यांची राज्य नेतृत्वावर टीका
भाजपाचे बिष्णुपूरचे खासदार सौमित्र खान यांनी त्यांच्या पूर्व पत्नी आणि टीएमसी उमेदवार सुजाता मोंडल यांचा ५,५६७ मतांनी पराभव केला. सौमित्र खान आणि सुजाता मोंडल यांच्या मतांमधील अंतर फार कमी होते. सौमित्र खान म्हणाले, “हे प्रयत्न केले नसते तर स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने जितक्या जागा जिंकल्या, तितक्याही जागा जिंकल्या नसत्या. आपल्या कारकिर्दीत निवडणुकीतील यशाचा अनुभव असणारे अनुभवी नेते पक्षात नाहीत आणि नेत्यांमध्ये संघटनात्मक ज्ञानाचाही अभाव आहे.” ते पुढे म्हणाले, “अनुभवी नेतेच राज्य चालवू शकतात. ही जागा (बिष्णुपूर) एक लाख मतांनी जिंकायला हवी होती. मी टीएमसीबरोबर असतो, तर मी ही जागा दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकली असती.”
हेही वाचा : स्मृती इराणी, कन्हैया कुमार ते ओमर अब्दुल्ला: लोकसभेत ‘या’ दिग्गज नेत्यांना बसला धक्का
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे वर्धमान-दुर्गापूरचे उमेदवार दिलीप घोष यांचा टीएमसीच्या कीर्ती आझाद यांच्याकडून १.३८ लाख मतांनी पराभव झाला. त्यांनीही राज्य नेतृत्वावर टीका केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे नाव न घेता घोष म्हणाले, “मी पुरेशी मेहनत केली, परंतु यश मिळाले नाही. राजकारणात प्रत्येक जण तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पक्ष २०२१ पर्यंत वेगाने पुढे जात होता. आम्ही २०२१ पर्यंत ज्या गतीने वाटचाल करत होतो, त्याच गतीने पुढे जाऊ शकलो नाही. या वर्षी आम्हाला खूप आशा होत्या, पण तशी कामगिरी करता आली नाही; याचे कारण तपासून यावर चर्चा व्हायला हवी.” घोष यांना २०२१ मध्ये प्रदेश भाजपा अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले होते. शिवाय त्यांना मेदिनीपूर जागेवरून तिकीट न देता वर्धमान-दुर्गापूरमधून तिकीट देण्यात आले होते. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, सुवेंदू यांनी घोष यांची स्थिती कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.
घोष यांनी अजूनही आरोप सुरूच ठेवले आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले, “कार्यकर्ते घराबाहेर पडू शकले नाहीत. बूथ-स्तरीय संघटना मजबूत करण्यासाठी मी एक वर्षाहून अधिक काळ मेदिनीपूरमध्ये राहिलो. मी माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट दिली आणि तेथे केंद्र सरकारचे अनेक उपक्रम राबविण्यास मदत केली. लोक माझ्या कामावर खूश होते. मात्र, पक्षाने वेगळा निर्णय घेतला. पण, आज तो निर्णय चुकीचा ठरला आहे.” भाजपाचा समर्पित कार्यकर्ता आणि संघाच्या पार्श्वभूमीतून आल्याने वर्धमान-दुर्गापूरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही त्यांनी हा निर्णय स्वीकारला होता.
सोशल मीडिया पोस्टवरूनही टीकाच
त्यानंतर घोष यांनी सोशल मीडियावर एक कोट पोस्ट केला, ज्याचे श्रेय त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिले. त्यात लिहिले होते, “एक गोष्ट लक्षात ठेवा, पक्षातील एकाही जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आवश्यक असल्यास, १० नवीन कार्यकर्त्यांना वेगळे होऊ द्या; कारण जुने कार्यकर्तेच विजयाची हमी आहेत. नवीन कार्यकर्त्यांवर लवकर विश्वास ठेवणे योग्य नाही.”
सुकांता मजुमदारांनी स्वीकारली अपयशाची जबाबदारी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी अपयशाची जबाबदारी घेतली. “प्रदेशाध्यक्ष म्हणून मला याची जबाबदारी घ्यावी लागेल. कदाचित मी प्रत्येक निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय कोणीही घेतला असेल, पण त्याची जबाबदारी मलाच घ्यावी लागेल,” असे मजुमदार यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उत्तर बंगालमधील बालूरघाटची जागा १०,३८६ मतांच्या अंतरांनी जिंकले.
भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, राज्यातील ४२ मतदारसंघांपैकी ३४ जागांवर उमेदवार निवडण्यात अधिकारी यांची भूमिका होती. त्यापैकी सात विजयी झाले. विरोधी पक्षनेते आणि भाजपातील इतर सदस्यांनी पक्षांतर्गत टीकेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी असेही सांगितले की, बंगालमधील संघाचे नेतृत्व भाजपामधील अधिकारी यांच्या भूमिकेवर खूश नव्हते आणि घोष यांनी मेदिनीपूर विधानसभा पोटनिवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा होती.
हेही वाचा : देशात सर्वाधिक काळ पदावर असणारे पंतप्रधान कोणते?
भाजपाच्या अंतर्गत वादावर बोलताना टीएमसीचे राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश मजुमदार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “पश्चिम बंगाल भाजपासाठी अशी परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज निवडणुकीदरम्यान वर्तवण्यात आला होता. भाजपाच्या उमेदवारांची यादी प्रामुख्याने सुवेंदू अधिकारी यांच्या नियंत्रणात होती. जवळपास ३० उमेदवार त्यांनी निवडले. आता त्याचे परिणाम दिसत आहेत. दिलीप घोष, सौमित्र खान आणि सुकांता मजुमदार यांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. बंगालमधील भाजपाच्या या असंतोषपूर्ण प्रयत्नाला सुवेंदू अधिकारी पूर्णपणे जबाबदार आहेत.”