‘गेल्या पाच वर्षांत मेघालायात शाळा, महाविद्यालये, रोजगानिर्मिती काहीच झाले नाही. घराणेशाही असलेल्या अशा सरकारला घरचा रस्ता दाखवून दिल्ली आणि मेघालयात भाजपचे सरकार स्थापन करावे’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील मतदारांना केले होते. तसेच ‘केंद्रातील मोदी सरकारने मेघालयाच्या विकासासाठी दिलेला निधी संगमा सरकारने हडप केल्यानेच तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार,’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. गेली पाच वर्षे मेघालयात संगमा आणि भाजप सरकारममध्ये एकत्र असताना भाजपने संगमा यांच्यावर अगदी वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हाच भाजप आता संगमा सरकारमध्ये सहभागी होत आहे आणि संगमांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
गेली पाच वर्षे मेघालयात कोनार्ड संगमा आणि भाजपची एकत्र सत्ता होती. विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचे संगमा यांनी आधीच जाहीर केले होते. ख्रिश्चनबहुल मेघालयात भाजपची साथ संगमा यांना राजकीयदृष्ट्या अडचणीची होती. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतो, असे संकेतही संगमा यांनी दिले होते. निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संगमा यांच्या पक्षावर टीका केली हे समजू शकते, पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी प्रचार सभांमधून संगमा यांना लक्ष्य केले होते. मोदी यांनी तर घराणेशाही, तसेच भ्रष्टाचाराचे आरोप संगमा यांच्यावर केले. अमित शहा यांनीही प्रचार सभांमधून संगमा सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराचे वाभाडे काढले. केंद्र सरकारचा निधी संगमा सरकारने दडवून ठेवला, असा आरोप केला. पंतप्रधान किसान निधी मेघालयात सामान्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच केंद्राच्या निधीचे संगमा सरकारने परस्पर नाव बदलून त्याचे सारे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भाजपने केला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला मेघालय सरकारने परवानगी नाकारल्याबद्दल भाजपने संगमा यांच्यावर टीका केली होती. भाजपच्या आरोपांवर कोनार्ड संगमा यांनी प्रत्युत्तर दिले होते. केंद्राचा निधी नागरिकांना मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती.
मोदी आणि शहा यांनी संगमा यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. तसेच मेघालयात भाजपचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मेघालयात भाजपचे फक्त दोन उमेदवार निवडून आले. ख्रिश्चनबहुल मेघालयातील मतदारांनी भाजपला साफ नाकारले. ईशान्येकडील प्रादेशिक पक्ष केंद्रातील सत्ताधारी पक्षाबरोबर हातमिळवणी करतात. यानुसारच प्रचाराच्या काळात वैयक्तिक टीकाटिप्पणी वा आरोपबाजी करूनही संगमा यांनी भाजपबरोबर जुळवून घेतले आहे. ६० सदस्यीय विधानसभेत संगमा यांच्या पक्षाला २६ जागा मिळाल्याने अन्य पक्षांच्या पाठिंब्याची गरज होती.
भाजपने प्रचाराच्या काळात जोरदार आरोपबाजी करूनही संगमा आणि भाजप सत्तेसाठी एकत्र आल्याबद्दल काँग्रेसचे माध्यम प्रमुख खासदार जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली आहे. या संदर्भात मोदी आणि अमित शहा यांनी संगमा यांच्यावर केलेल्या आरोपांची चित्रफितच रमेश यांनी ट्विट केली आहे. ‘भाजपचे वाॅशिंग मशीन आता पूर्ण वेगाने धावू लागेल’ अशी टिप्पणीही रमेश यांनी केली आहे.