मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असतानाही भाजपने किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.

महायुतीत शिवसेनेचा खासदार वा आमदार असलेल्या मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडे असलेले मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता. यातूनच भाजपची इच्छा असतानाही ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, दक्षिण मुंबई हे मतदारसंघ शिंदे गटाने लढविले होते. विधान परिषदेचा मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. पूर्वी भाजपचे या मतदारसंघात वर्चस्व होते. पण सुमारे ३० वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. प्रमोद नवलकर यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व मोडून काढले होते. प्रमोद नवलकर, डॉ. दीपक सावंत यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. सध्या विलास पोतनीस हे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत.

हेही वाचा : एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर

मुंबई पदवीधर मतदारसंघातून लढण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाचे डॉ.दीपक सावंत यांनी केली होती. डॉ. सावंत यांनी दोन वेळा एकत्रित शिवसेनेतून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. ‘आपण मुंबई पदवीधर मतदारसंघातून लढण्याची तयारी केली असून, मतदार नोंदणीतही पुढाकार घेतला होता’, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले होते. या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा असताना भाजपने किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक असलेले शेलार यांनी मतदार नोंदणीवर भर दिला होता.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाला फार काही यश मिळण्याची शक्यता नाही, असेच सारेच अंदाज वर्तविण्यात आले आहेत. असे असतानाच लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असताना सोमवारीच भाजपने शेलार यांची उमेदवारी जाहीर करून शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे लढल्यास शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या पथ्थ्यावरच पडेल.

हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

महायुतीत नाशिक शिक्षकची जागा शिंदे गटासाठी सोडण्यात येणार आहे. या बदल्यात भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघ मिळविल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.