भुवनेश्वर आणि दिल्लीत झालेल्या अनेक बैठका आणि चर्चेनंतरही ओडिशात भाजपा आणि बीजेडी यांच्यातील युतीची चर्चा फिस्कटली आहे. ओडिशात भाजपाने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. भाजपाचे ओडिशाचे अध्यक्ष मनमोहन सामल यांनी शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. आगामी निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार असल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी सायंकाळी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भाजपाचे ओडिशाचे अध्यक्ष मनमोहन सामल यांनी केली. तसेच यावेळी बोलताना नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील बीजेडीने वेळप्रसंगी केंद्रातील मोदी सरकारला केलेल्या मदतीबाबत त्यांनी आभारही मानले. यावेळी बोलताना, आम्ही ओडिशातील लोकांचे हितसंबंध आणि ओडिया अस्मितेच्या मुद्द्यावरून बीजेडी सरकारशी असहमत आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – अटकेविरोधात काँग्रेसचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी, पण पंजाबमध्ये मात्र…

भाजपाच्या या निर्णयानंतर बीजेडीकडून अद्यापतरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजेडीनेसुद्धा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते म्हणाले, ”ओडिशातील कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर आणि येथील परिस्थितीचा एकंदरित आढवा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बीजेडीशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लाट सद्या मोदींच्या बाजुने आहे.”

खरं तर बीजेडीबरोबरच्या युतीला भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. तरीही दिल्लीतल वरिष्ठ नेत्यांनी युतीची चर्चा सुरू केली होती. मात्र, ती अपयशी ठरली. ओडिशात सध्या भाजपाचा प्रभाव वाढतो आहे. राज्यात भाजपा सध्या क्रमांक दोनचा पक्ष आहे. तर काँग्रेसचा प्रभाव कमी होताना दिसून येत आहे. राज्यातील भाजपाचा वाढता प्रभाव बघता पक्षाला युती करण्याची गरज नाही, असा युक्तीवाद ओडिशातील भाजपा नेत्यांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजेडीने विधानसभेच्या १४७ पैकी १०० जागांनी मागणी केली होती. मात्र, भाजपाने त्यांना केवळ ५७ जागांचा प्रस्ताव दिला होता. तसेच निवडणुकीनंतरच्या मंत्रीपदाबाबतही दोन्ही पक्षात एकमत होऊ शकले नाही.

५ मार्च रोजी ओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे कौतुक केले होते. तसेच २०३६ पर्यंत ओडिशाला विकसित राज्य बनवण्यासाठी जे काही करावे लागेल, ते बीजेडी करेल, अशी पोस्ट बीजेडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही पक्षात युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

ओडिशातील भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा मात्र या युतीला विरोध होता. तसेच त्यांनी दिल्तील जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजेडीशी युती केल्यास त्याचा भाजपाला काही फायदा होणार नाही, असे या नेत्यांनी वरिष्ठांना सांगितले. तसेच ओडिशात भाजपाचा प्रभाव वाढतो आहे. तसेच बीजेडीचे अनेक नेते भाजपात येणार इच्छूक आहे, त्यामुळे ओडिशात भाजपा नंबर एकचा पक्ष बनू शकतो, असेही त्यांनी वरिष्ठांना सांगितले.

हेही वाचा – अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

स्थानिक नेत्यांच्या विरोधानंतर भाजपाने बीजेडीबरोबर युतीची चर्चा सुरू केली. आगामी निवडणुकीत ४०० जागांचे लक्ष असल्याने बीजेडीबरोबर युती करणे भाजपाला महत्त्वाचे वाटले. मात्र, ही चर्चा पूर्णपणे फिस्कटली.

दरम्यान, मागील निवडणुकीतील आकडेवारीचा विचार केला, तर भाजपाने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेतली आहे. या निवडणुकीत भाजपाने विधानसभेच्या २३ ते लोकसभेच्या ८ जागांवर विजय मिळवला होता. २०१४ च्या तुलनेत भाजपाच्या लोकसभेतील मतांची टक्केवारी २१.९ टक्क्यांवरून ३८.९ टक्क्यांपर्यंत वाढली. तर विधानसभेत मतांची टक्केवारी १८.२ टक्क्यांवरून ३२.८ टक्क्यांवर पर्यंत वाढली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will fight upcoming election on its own in odisha why discussion with bjp get failed spb