लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या राज्यांत तेथील परिस्थितीनुसार भाजपाकडून युती आघाड्यांचे गणित आखले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ओडिसा राज्यात भाजपा आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांच्यात युती होईल, असे म्हटले जात होते. मात्र, भाजपाने ही युतीची शक्यता आता फेटाळून लावली आहे. ओडिसामध्ये भाजपा आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे.
भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार
शनिवारी (३० डिसेंबर २०२३) ओडिशातील भुवनेश्वर येथे भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपाने ओडिशा या राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याबाबत भाजपाचे नेते तथा भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी माध्यमांना माहिती दिली. “ओडिशा भाजपाचे निरीक्षक सुनील बंसला यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की, बीजेडीशी युती होण्याची शक्यता नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि बीजेडी यांच्यात युती होणार असल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे. राज्यात भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय नेत्यांनीदेखील आम्हाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सज्ज व्हा, असे सांगितलेले आहे,” असे अपराजिता म्हणाल्या.
भाजपा-बीजेडी यांच्यात युती होणार नसल्याचे संकेत
शुक्रवारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका घेतल्या. या बैठकांत ओडिसा भाजपाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या नेत्यांनीदेखील भाजपा-बीजेडी यांच्यात युती होणार नसल्याचे संकेत दिले.
केंद्रात बीजेडीचा भाजपाला पाठिंबा
ओडिसा राज्यात भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. येथे भाजपा आणि बीजेडी हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक असले तरी केंद्रीय पातळीवर बीजेडीने अनेकवेळा भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. अनेक महत्त्वाची विधेयके संमत करताना बीजेडीच्या खासदारांनी भाजपाच्या बाजूनेच मतदान केलेले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनीदेखील बीजेडीचे सर्वेसर्वा तथा ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची आपल्या भाषणादरम्यान स्तुती केलेली आहे. तर पटनाईक यांनीदेखील २०२३ सालातील सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० पैकी ८ गुण देत केंद्रातील सरकारची वाहवा केलेली आहे.
११ वर्षे बीजेडी-भाजपाची युती
गेल्या काही दिवसांत भाजपाने बीजेडी पक्षाबाबत काही प्रमाणात मवाळ धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळेदेखील या दोन्ही पक्षांत युती होणार का? असे नेहमीच विचारले जात होते. या दोन्ही पक्षांत १९९८ ते २००९ अशी एकूण ११ वर्षे युती होती.
भाजपाचा जनाधार वाढला
दरम्यान, गेल्या काही वर्षांत भाजपाचा ओडिसा राज्यातील जनाधार वाढलेला आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १८ टक्के मते मळाली होती. २०१९ सालच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ३२.५ टक्क्यांनी वाढली. २०१९ साली भाजपाचे एकूण २३ उमेदवार निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीतही बीजेडी पक्षाला २०१४ साली २१.९ टक्के मते मिळाली होती. २०१९ साली हीच मते ३८.९ टक्क्यांनी वाढली.