अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीदरम्यान भाजपा उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आणखी एक कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्र सरकारच्या योजना मुस्लिम महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १२ जानेवारीपासून भाजपा राज्यभर कार्यक्रम आयोजित करणार आहे. याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांसारखे बडे नेते करतील आणि ‘धन्यवाद मोदी भाईजान’चा नारा देतील. ‘ना दूरी है ना खाई है, मोदी हमारा भाई है,’ असा त्यांचा नारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्व ७५ जिल्हे व्यापून टाकण्याची आणि प्रत्येक जिल्ह्यात सुमारे १ हजार मुस्लिम महिला लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी बोलावण्याची भाजपाची योजना आहे. कार्यक्रमांमध्ये महिला लाभार्थ्यांना या योजनांमुळे त्यांचे जीवन कसे बदलले याचे अनुभव सांगावे लागणार आहे. किंबहुना त्यासाठी मुस्लिम महिलांना मंचावर आमंत्रित केले जाणार आहे. तसेच उज्ज्वला योजना, पीएम आवास योजना, स्वच्छ भारत अंतर्गत शौचालये बांधणे आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ पोहोचला असून, त्यावरच लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे भाजप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे या योजना आणखी यशस्वी व्हाव्यात हा आमचा हेतू आहे. यूपीमध्ये अनेक महिलांना मोदी सरकारने राबवलेल्या या योजनांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. महिलांच्या मोठ्या वर्गाला शौच करण्यासाठी शेतात जावे लागत होते, परंतु मोदी सरकारने शौचालय बांधून दिल्याने ते बंद झाले. तसेच अनेक महिला लाकडावर अन्न शिजवत होत्या, परंतु उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना शेगडी आणि सिलिंडर मिळत असल्यानं तोसुद्धा त्रास त्यांचा कमी झाला. अनेकांना घर नव्हते, मात्र मोदी सरकारच्या पीएम आवास योजनेतून अनेकांना घरे बांधून देण्यात आली आहेत. त्यामुळेच मोदी सरकारच्या या योजनांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.”

हेही वाचाः INDIA आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर? राहुल गांधींच्या पदयात्रेतून वाद मिटणार का?

बासित अली म्हणाले की, कार्यक्रमांतर्गत बरेली, रामपूर, मुझफ्फरनगर, मुरादाबाद, अलीगढ आणि मेरठ यांसारख्या मोठ्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. “आम्हाला तिथल्या मुस्लिम महिलांचे अनुभव ऐकायचे आहेत आणि हे सरकार न्याय्य असून, समाजातील सर्व समुदायांसाठी काम करते हे त्यांना सांगायचे आहे,” असेही ते म्हणाले.

भाजपा नेत्यांचा असा अंदाज आहे की, यूपीच्या लोकसंख्येच्या सुमारे ७ ते ८ टक्के मुस्लिम महिला आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने ठेवणे पक्षासाठी मोठे फायद्याचे ठरू शकते. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, “मागील सरकारांनी मुस्लिम महिला आणि त्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, कारण त्यांनी त्यांची व्होट बँक म्हणून मुस्लिम महिलांऐवजी पुरुषांवर लक्ष केंद्रित केले होते. परंतु महिला पुरुषांइतक्याच महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच आमच्याकडे महिलांसाठी विशेष योजना आणि कार्यक्रम आहेत, असंही भाजपाचं म्हणणं आहे.

हेही वाचाः अजित पवारांची भविष्यवाणी खरी ठरणार का ?

आणखी एका नेत्याने सांगितले, “कार्यक्रमांदरम्यान आम्ही महिलांवर लक्ष केंद्रित करणारी मोदींची भाषणे दाखवणार आहोत. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुस्लिम महिलांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. मोदी सरकारने राबवलेल्या या योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना कोणी मदत केली हे माहीत नाही. त्यामुळे मुस्लिम महिलांना हे कळाले पाहिजे की मोदी सरकार त्यांच्यासाठी किती काम करीत आहे. भाजप सरकारचे त्यांच्यावर विशेष लक्ष आहे हेसुद्धा आम्ही त्यांना सांगणार आहोत.” विशेष म्हणजे अल्पसंख्याक समुदायाने भाजपपासून अंतर राखले असतानाही मुस्लिम महिलांना आकर्षित करण्याचा भाजपाचा गेल्या काही दिवसांपासूनचा प्रयत्न कायम सुरू आहे. मुस्लिम महिला वाढत्या संख्येने भाजपा पक्षाला मतदान करतात, असा दावाही भाजपा नेते करीत आहेत.

खरं तर तिहेरी तलाकवर बंदी घालणारा कायदा हेसुद्धा मोदी सरकारचं मोठं यश असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, त्यामुळे मुस्लिम महिला भाजपाकडे अधिकाधिक प्रमाणात आकर्षित होतील, असेही भाजप नेत्यांना आता वाटू लागले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मार्गाने तिहेरी तलाखच्या माध्यमातून पतींनी घटस्फोट घेतलेल्या सुमारे ३०० महिलांची भेट घेतली आणि त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना जाहीर केल्या. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षावर मुस्लिम मुलींच्या वेदना दुर्लक्षित केल्याबद्दल हल्ला चढवला होता.

मुस्लिम भाजपा पक्षाला मत देत नाहीत, असा गैरसमज पसरवल्याचा आरोप यूपीमधील भाजप नेत्यांनी विरोधकांवर केला. यूपी भाजपशी संबंधित एका मुस्लिम नेत्याने सांगितले की, “विरोधी पक्ष हा दावा करतात, कारण त्यांना मुस्लिम मते टिकवायची आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत भाजपच्या कार्यक्रमांमध्ये मुस्लिम महिलांचा सहभाग वाढत आहे. त्यांना सरकारी योजनांमधून मोठ्या प्रमाणात फायदे मिळत आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेतील सुधारणा यांचा हा थेट परिणाम आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will reach out to muslim women across uttar pradesh targeting more than 75 thousand beneficiaries vrd
Show comments