कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धूळ चारली. या निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर भाजपाने आपला मोर्चा आता तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष दिले आहे. या वर्षात या पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत. दरम्यान, या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने मेगा प्लॅन आखला आहे. देशभरातील तीन हजार भाजपा कार्यकर्त्यांची निवड करून भाजपा त्यांना प्रशिक्षण देणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी तीन हजार विशेष कार्यकर्त्यांची निवड
वरील पाच राज्यांतील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. पक्षाने देशभरातील ८ हजार भाजपा कार्यकर्त्यांमधून ३ हजार जणांची निवड केली आहे. या कार्यकर्त्यांना भाजपातर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर या कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा या राज्यांमध्ये निवडणुकीच्या कामासाठी पाठवले जाणार आहे. याच तीन हजार भाजपा कार्यकर्त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जून रोजी भेट घेणार आहेत. या भेटीत मोदी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका तसेच या निवडणुकीत करावयाच्या कामाबद्दल सांगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> के. चंद्रशेखर राव यांच्या राज्यातील पक्षविस्ताराची प्रस्थापितांना चिंता
नरेंद्र मोदी तीन हजार कार्यकर्त्यांना संबोधित करणार!
मोदी २७ जून रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान ते ‘जबलपूर-इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते निवडलेल्या तीन हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. निवड करण्यात आलेले हे तीन हजार कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करणारे आहेत. देशातील लोकसभा मतदासंघांतून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवडीसाठी भाजपाने नमो ॲपचा वापर केला आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना २८ जून रोजी निवडणूक असलेल्या राज्यांत पाठवले जाणार आहे. या राज्यांमध्ये कार्यकर्ते दहा दिवस राहणार असून या काळात ते निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणार आहेत.
हेही वाचा >> मुस्लीम धर्म त्यागून हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या अली अकबर यांची भाजपाला सोडचिठ्ठी; म्हणाले, “आता धर्मासाठी…”
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दरम्यान, भाजपाने याआधीच्या निवडणुकीतही सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हे स्पष्ट झालेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘मोदी वन्स मोअर’ ही मोहीम देशभरात राबवली होती. ही मोहीम राबवण्यासाठी भाजपाने तंत्रज्ञान अवगत असणारे वकील, शिक्षक, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच अन्य क्षेत्रांत काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा उपयोग केला होता. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपा कशी कामगिरी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.