पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजपाकडून हरतऱ्हेने केला जातोय. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा उद्देश ठेवून भाजपाचे नेते येथे आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. भाजपाकडून येथील प्रत्येक निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. दरम्यान, भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या मतदारसंघातील भेकुटिया समबय सहकारी कृषी समितीच्या निवडणुकीत भाजपाने चांगलीच मुसंडी मारली आहे. भाजपाने या निवडणुकीत १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या असून तृणमूलला येथे फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. या विजयानंतर ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात भाजपा नेत्रदीपक कामगिरी करेल, असे भाजपाकडून म्हटले जात आहे.
हेही वाचा >> त्रिपुरा : “भाजपाच्या पराभवासाठी काहीही करू,” काँग्रेसचे विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन
सुवेंदू अधिकारी यांच्या नंदीग्राम या मतदारसंघातील भेकुटिया समबय सहकारी कृषी समितीच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने १२ पैकी ११ जागांवर विजय झाला असून तृणमूल काँग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आलेला आहे. याआधी मागील महिन्यात नंदीग्राम मतदारसंघातील हनुभुनिया, घोलपुकुर आणि बिरुलिया येथील सहकारी निवडणुकीत सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला होता. या तिन्ही सहकारी कृषी समित्यांवर भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती.
हेही वाचा >> आंध्रप्रदेश अजूनही राजधानीच्या प्रतीक्षेत, सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव
पश्चिम बंगालमध्ये एकूण १४ हजार सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. यातील एका सहकारी कृषी समितीत भाजपाचा विजय म्हणजे फार मोठी बाब नसल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. मात्र भाजपाकडून या विजयाला आगामी काळात मोठ्या विजयाकडे चाहूल म्हणून पाहिले जात आहे. मी सर्व विजयी उमेदवार तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. या विजयामुळे पक्षातील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढेल. आगामी काळात भाजपाला राज्यभरात मोठे यश मिळेल. ही तर फक्त सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे.
हेही वाचा >> एकाचवेळी दोन ठरावांच्या मंजुरीमुळे काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडीच्या गुंतागुंतीत वाढ
दरम्यान, या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. मागील महिन्यात पार पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला भोपळाही फोडता आलेला नव्हता. या निवडणुकीमध्ये तृणमूलने पूर्ण बहुमतात या निवडणुका जिंकल्या होत्या. भाजपाचा मागील काळात अनेक महत्त्वाच्या निवडणुकात पराभव झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमधील भाजपाच्या यशाला फार मोठे करण्याची गरज नाही. आम्ही जिल्हा नेतृत्वाकडून या पराभवाबद्दलचा अहवाल मागवला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष यांनी दिली.
हेही वाचा >> महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये घेण्यात आला आहे ‘हा’ मोठा निर्णय, देशात असं पहिल्यांदाच घडणार
नंदीग्राम मतदरासंघात सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा १९५६ मतांनी पराभव केला होता. ही निवडणूक सुवेंदू यांनी प्रतिष्ठेची केली होती. या विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांच्याकडे प्रमुख विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. तर या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकूण ७७ जागा जिंकता आल्या होत्या.