चंद्रपूर : कुठलीही निवडणूक ही जिंकण्यासाठीच असते, या आत्मविश्वासाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली भाजप व महायुती, याच्या अगदी उलट कुठल्याही परिस्थितीत स्वपक्षाच्या उमेदवाराला जिंकू द्यायचे नाही, इतक्या खालच्या पातळीवर गेलेला काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतील गटबाजी यामुळेच जिल्ह्यात भाजपचा दणदणीत विजय झाला, तर काँग्रेस भुईसपाट झाली.
जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व चिमूर या पाच मतदारसंघांत भाजप, तर ब्रम्हपुरी या एकमेव मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव व मतदार संघातील कमी झालेले मताधिक्य भाजपच्या स्थानिक आमदार व नेत्यांनी अतिशय गांभीर्याने घेतले व अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यास सहा महिन्यांपूर्वीपासूनच तयारी सुरू केली. दुसरीकडे, लोकसभेतील मताधिक्य डोक्यात इतके भिनले की काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वच नेते, खासदार व आमदार हवेत होते. याच मग्रुरीतून एकमेकांना पाडण्याची भाषा काँग्रेस नेते करायला लागले. त्यातून गटबाजी इतकी फोफावली की अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघात दलित समाजातील सामान्य कार्यकर्ता प्रवीण पडवेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचा एकही नेता घराबाहेर पडला नाही. थंड हवेच्या खोलीत बसून सर्व नेते पडवेकर यांची प्रचारातील फरफट बघत होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आशीर्वाद असलेले अपक्ष राजू झोडे यांच्या बंडखोरीने अनेक काँग्रेस पदाधिकारी झोडे यांच्या प्रचारात सक्रिय होते. याउलट किशोर जोरगेवार यांनी भाजपत प्रवेश करून थेट निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण शक्तीने काम करीत नाही, ही बाब निदर्शनास येताच त्यांनी स्वतःच्या यंग चांदा ब्रिगेडच्या टीमला सक्रिय केले. दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात मांसाहारी व शाकाहारी जेवणावळीपासून निवडणुकीतील अर्थपूर्ण मदतीपासून जे जे करणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी जोरगेवार यांनी केल्या. भाजपने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
आणखी वाचा-ठाणे शहरात मनसेची प्रचारात केवळ हवाच, निकालात मात्र पिछेहाट
लोकसभा निवडणुकीत दुरावलेल्या कुणबी समाजाला भाजपसोबत आणण्यासाठी राजुरा, ब्रम्हपुरीत कृष्णा सहारे व वरोरामधून करण देवतळे असे एकाच वेळी तीन कुणबी उमेदवार दिले. राजुरा येथे कुणबी समाजाचे देवराव भोंगळे या युवा कार्यकर्त्याला संधी दिली. भोंगळे यांना सुरुवातीला स्थानिक पातळीवर बाहेरचा उमेदवार म्हणून मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर समर्थकांनी तीव्र विरोध केला. मात्र भोंगळे यांनी साम, दाम, दंड या युक्तीप्रमाचे स्वतःला प्रचारात झोकून दिले व विजय संपादन केला. याउलट काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. वरोरा येथे भाजपचे करण देवतळे या नवख्या उमेदवाराच्या पाठीशी अनुभवी हंसराज अहीर उभे राहिले, तर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कुठलीही योग्यता नसताना लाडका भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी पक्षनेत्यांशी वाद करून उमेदवारी आणली. धानोरकर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचे बघून काकडे यांना पाडण्यासाठी काँग्रेस विचारधारेचे आणखी चार कुणबी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरीत कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर कसे पराभूत करता येईल याच विचाराने ग्रस्त धानोरकर स्वतःच्या समाजाच्या बळावर लाडक्या भावालाही निवडून आणू शकल्या नाही.
आणखी वाचा-ना राहुल गांधीच्या पोह्यांची मदत, ना प्रियंकाच्या संघ बालेकिल्ल्यातील दौऱ्याचा फायदा
निवडणूक व उमेदवारी जाहीर होताच भाजपचे सर्वच उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते एकाच वेळी प्रचारात उतरले. मतदारसंघाच्या बाहेर कुणी पडले नाही. त्याचाही फायदा झाला. लोकसभेतील पराभवापासून सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मतदारसंघात गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय सक्रिय होते. येथे काँग्रेसकडून संतोष सिंह रावत यांना उमेदवारीसाठी बराच संघर्ष करावा लागला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही काँग्रेस पक्षात डॉ. अभिलाषा गावतुरे व प्रकाश पाटील मारकवार, अशी दुहेरी बंडखोरी झाली. त्याचा फटका रावत यांना बसला. चिमूर क्रांतीभूमित भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य जाहीर सभेचा फायदा भांगडिया यांना झाला. मात्र काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची नियोजनबद्ध सभा होऊनदेखील काँग्रस उमेदवार सतीश वारजुरकर त्याचा फायदा घेऊ शकले नाही. येथेही काँग्रेस पक्षातील गटबाजी प्रामुख्याने दिसून आली.
ब्रम्हपुरी मतदारसंघावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मजबूत पकड असतानाही भाजपचे नवखे उमेदवार कृष्णा सहारे यांनी वडेट्टीवार यांना घाम फोडला. कृष्णा सहारे कुणबी समाजातून येतात. वडेट्टीवार यांचा पराभव व्हावा, अशी सुप्त इच्छा असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीच सहारे यांना सामाजिक बळ दिले. भाजपला उरल्यासुरल्या मदतीसाठी लाडकी बहीण योजना धावून आली. एकूणच भाजपची सर्वच पातळीवरची सूत्रबद्धता व काँग्रेसची गटबाजी विजय व पराभवाला कारणीभूत ठरली.