BJP Hyderabad Loksabha Candidate Madhavi Lata लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. १९५ उमेदवारांच्या त्या यादीत २८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या यादीतील एका नावाची चर्चा सर्वाधिक होत असून त्यांचे नाव आहे माधवी लता. रा. स्व. संघाशी असलेली जवळीक त्यामुळे त्या ‘संघाची कन्या’ म्हणून ओळखल्या जातात. शिवाय, पारंपरिक भारतीय महिला, उद्योजक, रुग्णालय प्रशासक व प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना अशीही त्यांची ओळख आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.
४९ वर्षीय माधवी लता यांनी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पक्षाचे तिकीट मिळणे ही १८ वर्षांच्या समाजकार्याची पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले. “त्या पक्षातील लोकप्रिय कार्यकर्त्या नाहीत. तरीही त्यांची निवड का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदाचित महिला नेतृत्व, दमदार वक्तृत्व आणि मुस्लिम महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य पाहता पक्षाने हा निर्णय घेतलेला असावा. पक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देईल,” असे एका भाजपा नेत्याने सांगितले.
एआयएमआयएमच्या बालेकिल्ल्यात लढा
बहुचर्चित हैदराबाद लोकसभा मतदारसंघ एआयएमआयएमचा बालेकिल्ला आहे. सलाहुद्दीन ओवैसी यांनी १९८४ ते १९९९ या काळात ही जागा जिंकली होती. २० वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांचा मुलगा असदुद्दीन ओवैसी हे या मतदारसंघातून जिंकत आला. हैदरबादमध्ये लोकसभेच्या अंतर्गत येणारा एक विधानसभा मतदारसंघ सोडल्यास उर्वरित सर्व मतदारसंघ एआयएमआयएमकडे आहेत. हैदराबादमध्ये केवळ गोशामहल मतदारसंघ भाजपाकडे आहे; जिथे भाजपाचे टी. राजा सिंह आमदार आहेत.
२०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या हैदराबादमधून ओवैसींच्या विरोधात भाजपाचे दिग्गज नेते भगवंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, दोन्ही वेळा असदुद्दीन यांच्याकडून मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला. सूत्रांनी सांगितले की, संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख, वरिष्ठ रा. स्व. संघ नेते इंद्रेश कुमार यांच्याशी माधवी लता यांचे जवळचे संबंध आहेत. इंद्रेश कुमार यांच्याकडे त्या एक मार्गदर्शक म्हणून पाहतात. त्यामुळेच त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
हिंदू-मुस्लिम हा माझा निवडणूक मुद्दा नाही : माधवी लता
“हिंदू-मुस्लिम हा माझा निवडणूक मुद्दा असता तर भाजपाने मला अजिबात निवडले नसते. पक्षाला माहीत आहे की, मी अनेक मुस्लिमांसोबत काम करते आणि मला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. मी तिहेरी तलाकवर कठोर भूमिका घेतली होती. जर मी मंदिरासाठी उपोषण करू शकत असेन, तर मी मुस्लिम महिलांसाठीही तसेच करेन,” असे माधवी लता यांनी सांगितले.
माधवी लता या याकुतपुरा येथील संतोष नगर कॉलनीत एका निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्या. त्या म्हणतात, “माझा नेहमीच वेगवेगळ्या संस्कृतींशी परिचय होता. १९८० च्या दशकात झालेल्या जातीय दंगली माझ्यासाठी त्रासदायक होत्या. कोणाचा तरी जीव घेऊन लोक आपला द्वेष का व्यक्त करीत असतील, असा प्रश्न त्यावेळी मला पडला होता. आज अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मला जाणवतेय की, यामागे सामान्य माणूस नसून, एक राजकीय खेळ आहे.”
लता यांनी ओवैसींवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “सामान्य माणसाला मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम; त्यांना हिंसा नको असते. एका हिंदूला सामान्य मुस्लिमांमुळे नाही, तर सत्तेवर असलेल्या आणि दोन समुदायांमध्ये शांतता नको असलेल्या मुस्लिम पुरुषांमुळे त्रास होत आहे.” विद्यमान खासदारांना खुले आव्हान देत त्या म्हणाल्या, “मी जुन्या शहरातील प्रत्येक चौकात प्रचार करीन आणि माझ्यावर एक दगड जरी फेकला गेला तरी असदुद्दीन त्याला उत्तरदायी असतील.”
बराबरी का मुकाबला!
लता यांनी त्यांच्या विरोधकांना ‘बराबरी का मुकाबला (समान स्पर्धा)’ करण्याचे आवाहन केले. हैदराबादमध्ये मतदान केंद्रांमध्ये मतदारांना धमकावले जात असल्याचेही लता यांनी सांगितले. “मी निवडणूक आयोगाला विनंती करते की, मतदान प्रक्रियेच्या लाइव्ह प्रक्षेपणाला परवानगी द्यावी आणि पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त तैनात करावा,” असे त्या म्हणाल्या. लता यांच्या म्हणण्यानुसार, त्या मतदारसंघातील १९९६ मतदान केंद्रांवर पाळत ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्सकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधणार आहेत. “एकदा हे झाले की, दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा (गोष्टी स्पष्ट होतील),” असे त्या म्हणाल्या.
मतदार यादीतून हिंदूंना हटविल्याचा आरोप
दोन लाखांहून अधिक हिंदू मतदारांना मतदार यादीतून हटविल्याचा गंभीर आरोपही लता यांनी केला. त्या म्हणाल्या, “चार दशकांपासून ही प्रथा आहे. देशाला वाटते की ओल्ड सिटी भागात मुस्लिमांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे असदुद्दीन जिंकत आले आहेत. मला असदभाईंना (असदुद्दीन ओवैसी) सांगायचे आहे की, तुमच्यामुळे ज्यांना त्रास सहन करावा लागला, त्या सर्व समुदायातील लोकांकडून मला मते मिळतील. मी माझ्या आयुष्याच्या मिशनवर आहे.”
हेही वाचा : Loksabha Poll 2024 : हिंदी भाषक प्रदेशात AIMIM ची ‘एंट्री’; ‘इंडिया’ आघाडीसमोर आणखी एक आव्हान!
सीएए, समान नागरी कायदा आणि तिहेरी तलाक यांच्याबद्दल लोकांमध्ये असणारे गैरसमज दूर करणेदेखील प्राधान्यक्रमावर असल्याचे त्यांनी संगितले. “मी माझ्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना सांगू इच्छिते की, सीएएमुळे त्यांना फायदा होईल. कारण- इतर कोणत्याही देशातील मुस्लिम व्यक्तीला नागरिकत्व (सहजतेने) दिले जाणार नाही. त्यामुळे ते देशातील नागरिकांना दिल्या जाणार्या फायद्यांसाठीही पात्र ठरणार नाहीत”, असे माधवी लता म्हणाल्या.