लातूर- लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा अंतर्गत गटबाजी विकोपला गेली असून माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या निलंबनाची मागणी रेणापूर तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केली आहे.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा भाजपाकडे राहणार की शिवसेनेकडे (शिंदे) गटाकडे राहणार हे महायुतीत अद्याप ठरलेले नाही. भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रमेश कराड यांनी या मतदारसंघात दोन वेळा निवडणूक लढवली आहे ते पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर भाजपचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी दुसरे इच्छुक उमेदवार आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये खदखद

गेल्या दोन दिवसापासून त्यांनी या विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा काढली असून या यात्रेदरम्यान ते विविध गावात संपर्क करत आहेत त्यांच्या यात्रेच्या विरोधात भाजपच्या रेणापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून एरवी ते कधीच मतदार संघात फिरकत नाहीत आता ऐन निवडणुकीच्या काळात ते परिवर्तन यात्रा काढत आहेत त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीच्या कारणास्तव त्यांना भाजपातून निलंबित करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या तालुकाध्यक्षा सह विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी याबाबतीत कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ सुपूत्र धीरज देशमुख हे या मतदार संघातून २०१९ साली एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती. धीरज देशमुख यांच्या विरोधात लढत देणाऱ्या भाजपा अंतर्गत गटबाजी उफाळून आल्यामुळे भाजपा काँग्रेसच्या विरोधात कसा लढा देणार अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.