भंडारा : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याने भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. भंडारा जिल्ह्यात मात्र भाजपची अधोगती कायमच आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भाजपला २०१९ आणि आताच्या विधानसभा निवडणुकीतही सपशेल अपयश आले. यावेळी भाजपला आधी जागांसाठी संघर्ष करावा लागला आणि जेथे कमळ चिन्हावर निवडणूक लढविली, तेथे पराभव झाला.
२०१४ मध्ये तुमसर मतदारसंघात चरण वाघमारे, भंडाऱ्यात रामचंद्र अवसरे आणि साकोलीत बाळा काशीवार यांनी भाजपचा झेंडा रोवला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे विजयी झालेत. यामुळे भाजपची जिल्ह्यावरील पकड अधिकच मजबूत झाली. मात्र, त्यानंतर सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. तुमसरमध्ये प्रदीप पडोळे, भंडाऱ्यात अरविंद भालाधरे आणि साकोलीत परिणय फुके हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले. येथूनच भाजपच्या वर्चस्वाला तडा गेला.
आणखी वाचा-विदर्भातून निवडून आलेल्यांपैकी ३७ आमदार ओबीसी, विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र
तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ १९९५ ते २००९ पर्यंत भाजपच्या ताब्यात होता. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपने हा मतदारसंघ पुन्हा काबीज केला. भंडारा मतदारसंघात १९९० ते २०१९ या काळात तब्बल चार वेळा भाजप उमेदवाराचा विजय झाला. २०१९ मध्ये मात्र जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांतून भाजप पक्ष हद्दपार झाला.
भाजपला जिल्ह्यात नवी उभारी देण्याची संधी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली. मात्र, लोकसभा निवडणुकीतही भाजप उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर विधानसभा निवडणुकीत तीनही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार द्यावे, असा आग्रही सूर उमटला. मात्र, यातही अपयश आले. महायुतीत भंडारा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे, तर तुमसर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. साकोलीत भाजपला संधी मिळाली, मात्र तेथे राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करावा लागला. भाजपच्या उमेदवारीवर लढलेल्या राष्ट्रवादीच्या शिलेदाराला निसटता पराभव स्वीकारावा लागला. यामुळे एक जागा मिळाली, मात्र तेथेही कमळ फुलले नाही. एकंदरीत, २०२४ मधील लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही भाजपची अधोगतीच झाली.