गडचिरोली : जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीपुढे बंडखोरांचे आव्हान आहे. पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत असला तरी भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम व काँग्रेसचे आनंदाराव गेडाम आणि हणमंतू मडावी हे ठाम आहे. तर भाजपचे डॉ. देवराव होळी, काँग्रेसचे विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे माघार घेऊ शकतात. त्यामुळे ४ नोव्हेंबरला कोण ठाम राहणार आणि कोण माघार घेणार याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत नाराज इच्छुक उमेदवारांनी केलेली बंडखोरी शमवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून जोरकस प्रयत्न केले जात आहे. उद्या ४ नोव्हेंबर माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आता केवळ काही तास शिल्लक आहे. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी तर भाजपकडून आमदार परिणय फुके गडचिरोलीत दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील एकंदरीत चित्र बघितल्यास आरमोरी विधानसभेतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार डॉ.शिलू चिमूरकर, वामनराव सावसागडे माघार घेऊ शकतात. पण माजी आमदार डॉ. आनंदराव गेडाम अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

आणखी वाचा-शिराळ्यातील बंडोबाना थंड करण्यात भाजपला यश

उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले गेडाम यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असणार आहे. तर गडचिरोलीत काँग्रेसचे विश्वजीत कोवासे आणि सोनल कोवे हे दोन्ही बंडखोर माघार घेण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी हे देखील माघार घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दुसरीकडे सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहेरी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेसचे बंडखोर हणमंतू मडावी आणि भाजपचे बंडखोर अम्ब्रीश आत्राम अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. पक्षांकडून दोघांची समजूत काढण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शरद पवार गटाला मतविभाजनाचा फटका बसू शकतो.

आणखी वाचा-विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा

…तर कारवाई अटळ

समजूत काढल्यानंतरही बंडखोरीवर ठाम राहिल्यास पक्षाकडून कारवाई अटळ आहे. यासंदर्भात काँग्रेस आणि भाजपमधील नेत्यांना विचारणा केली असता त्यांनी पक्षशिस्त मोडणाऱ्यांची कायमची हकालपट्टी करण्याच्या सूचना मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे तरुण बंडखोर उमेदवार माघार घेणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु अहेरीतून अम्ब्रीश आत्राम हे माघार घेणार नाहीत. विशेष म्हणजे त्यांची समजूत काढण्याचे भाजपकडूनही प्रयत्न होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps dr devrao holi congresss vishwajit kowase dr sonal kovey are likely to withdraw from gadchiroli vidhan sabha election 2024 print politics news mrj