चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्याने होणाऱ्या चौफेर टीकेमुळे गर्भगळीत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना घराबाहेर काढण्यासाठी उध्दव ठाकरे यांचा ‘कलंक’ वार उपयोगी पडल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. सोबतच या टीकेमुळे आपोआपच लोकांचें लक्ष इतरत्र वळल्याने ही बाबही भाजपच्या पत्थ्यावर पडणारी ठरली आहे.

ठाकरेंचा वक्तव्यानंतर निषेध करण्यासाठी कार्यकर्ते अनेक महिन्यांनंतर रस्त्यावर आले. बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या अनेक आघाड्यांनी ठाकरेंचा विरोध व फडणवीस कसे नागपूर भूषण आहे हे सांगण्याची संधी साधली. एकूणच काय तर अनेक दिवसांनंतर भाजप रस्त्यावर दिसली. पूर्वी हीच भाजप राज्यात मविआचे सरकार असताना उठसूठ रस्त्यावर येत होती. करोना काळात सुध्दा आंदोलने करण्यात आली. यातून भाजपचे सत्ता हातून गेल्याने दुःख दिसून येत होते. पण कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडून ठेवण्यासाठी कार्यक्रम लागतो व तो कार्यक्रम आंदोलनाच्या निमित्ताने त्या काळात पक्षाने दिला होता.

आणखी वाचा-भाजपाने ‘पुराचे राजकारण’ केले; दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’ सरकारचा आरोप

एक वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पाडून भाजप पुन्हा सत्तेवर आली. आंदोलने थांबली, कार्यकर्तेही स्थिरावले. या सत्ताबदलाला भाजपने रणनीती म्हंटले असले तरी तेंव्हाही लोकांना ते आवडला नव्हते. त्या काळात विदर्भात झालेल्या विधान परिषदांच्या दोन निवडणुकीत भाजपचा पराभव करून लोकांनी राग व्यक्त केला होता. मुळ शिवसेना आपल्या सोबत आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेली शिवसेना हिंदू विरोधी आहे, असे भाजपकडून कार्यकर्त्यांना सांगितले जात होते.

शिवसेना फोडल्यावर एक वर्षाने भाजपने राष्ट्रवादीही फोडली. तेंव्हा या युतीचे समर्थन करणे कार्यकर्त्यांना अवघड जाऊ लागले. चौफेर टीकेमुळे कार्यकर्ते गप्पगार झाले. कारण मागील दोन दशकांपासून पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलने करीत होते. या पक्षाचे नेते कसे भ्रष्ट आहेत हे सांगत होते. त्यामुळेच मुंबईत अजित पवार यांचा शपथविधी झाल्याच्या दिवसांपासून नागपुरात भाजपच्या वर्तुळात शांतता होती. रोज पत्रकारांशी बोलणा-या बावनकुळे यांना यावर प्रतिक्रिया देताना जड जात होते. विकासाचा मुद्दा पुढे करीत होते. समाज माध्यमांवर तर भाजपविरुद्ध टीकेची मोहीम सुरू झाली. याला उत्तर देऊ न शकणाऱ्या कार्यकर्त्यांनी मग शांत बसणे पसंत केले होते. नेमक्या याच काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना कलंक म्हंटले व वातावरण बदलले. नागपुरात येऊन ठाकरे यांनी टीका केल्याने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया भाजपमध्ये उमटने स्वाभाविक होत्या. तशा त्या उमटल्या. कार्यकर्ते रस्त्यावर आले. ‘कलंक’ ला प्रत्युत्तर ‘कलंकित करंटा’ ने देण्यात आले. ठाकरेंचे फलक फाडण्यात आले. एकूण काय तर यानिमित्ताने कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर आले.

आणखी वाचा-इस्रोकडून आतापर्यंत ८९ वेळा प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींच्या काळात किती मोहिमा झाल्या?

भाजपच्याही संस्कृतीचे दर्शन

ठाकरे यांनी राजकारणात कोणती भाषा वापरायची याचे धडे देणाऱ्या भाजपची संस्कृतीही यानिमित्ताने उघड झाली. ठाकरेच कसे महाराष्ट्राला कलंक आहे हे सांगण्यासाठी फडणवीस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रत्येक ओळीत कलंक शब्द आहे. बावनकुळे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत तब्बल ३० वेळा या शब्दाचा उच्चार केला. ‘तर जोड्याने मारु’ असा इशारा दिला.

“देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला. -चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा