मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे ३० हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीतील महाविजय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकण्यासाठी हे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षभरात भाजपची प्रदेश पातळीवर तीन मोठी अधिवेशने पार पडली. नाशिक, भिवंडी येथील अधिवेशन झाल्यावर पुण्यातील बालेवाडीत महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन झाले. पराभवाच्या कारणांविषयी चिंतन झाल्यावर विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आले होते. विधानसभेत अभूतपूर्व विजय मिळाल्याने भाजपचा उत्साह दुणावला असून या अधिवेशनात विजयोत्सव साजरा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव त्यात मांडण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आता सज्ज असून सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यावर एप्रिलमध्ये या निवडणुका होतील, यादृष्टीने पक्षाने तयारी सुरु केली आहे.

आणखी वाचा-अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?

विधानसभेत भाजपला मोठे यश मिळाले, तसेच प्रचंड यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून ‘ग्रामपंचायत ते संसद (पंचायत से पार्लमेंट)’ ‘शत प्रतिशत’ भाजप हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे फडणवीस यांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळेल, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.