अविनाश कवठेकर
दोन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारपासून बारामतीचा दौरा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येणारे बावनकुळे बारामतीमधून दौऱ्याला प्रारंभ करणार असल्याने भाजपने बारामतीकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे ‘मिशन बारामती’
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भेट देणार आहेत. निर्मला सीतारामन संघटनात्मक बैठकांबरोबरच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यानंतर भाजपचे अन्य वरिष्ठ नेते बारामती दौरा करणार असल्याने भाजपने बारामतीला दिलेले राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… प्रयत्न करूनही राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात का वाढत नाही?
भाजपने ‘ए फाॅर अमेठी मिशन ‘ २०१९ मध्ये यशस्वी केले. आता ‘बी फाॅर बारामती’ मिशनची तयारी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केरळ मधील वायनाड मधून निवडणूक लढवावी लागली, त्याप्रमाणे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुसरा मतदारसंघ शोधावा, असे जाहीर आव्हानच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. गेली ५५ वर्षे झाली, आम्ही बघतोय अनेक जण येतात, भेटतात आणि जातात. बारामतीत पंतप्रधान आले त्यांचेही आम्ही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, चंद्रशेखर बावनकुळे आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे, बारामतीकरांना भेटावे, मात्र बारामतीकर त्यांना जे हवे आहे तेच करतात, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपला दिले आहे.
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नियोजित ‘भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन’ला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऑगस्टमधील लांबलेला बारामती दौरा ६ सप्टेंबर रोजी निश्चित झाला आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा आहे. मात्र हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीपासून सुरू होणार असल्याने या दौऱ्याचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे आढावा घेणार आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेले मतदारसंघ खेचण्यासाठीची रणनीति भाजपकडून हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत काही झाले तरी बारामतीचा गड सर करायचाच, असा निर्धार भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे बावनकुळे आणि सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या दिल्ली आणि मुंबईतील नेत्यांनी बारामतीकडे लक्ष केंद्रीत केले असले तरी बारामतीमध्ये मताधिक्याची कोंडी फोडणे भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.