अविनाश कवठेकर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी आता भारतीय जनता पक्षाने आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकांवरही लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. बारामती तालुक्यातील माळेगांव नगरपंचायतीचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन ही निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे भाजपच्या मिशन बारामतीची सुरुवात नगरपंचायतीच्या निवडणुकीपासूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे गोविंद बाग निवासस्थान, माळेगांव साखर कारखाना आणि शिवनगर विद्या प्रसारक मंडळ नगरपंचायतीच्या हद्दीत येतात. माळेगांव साखर कारखान्याची ओळख ही पवारांचा घरचा साखर कारखाना अशी आहे. गेली कित्येक वर्षे पवार कुटूंबियांच्या ताब्यात असलेला माळेगांव कारखाना शरद पवार विरोधी रंजन तावरे गटाने ताब्यात घेतला होता. मात्र कारखान्याची सत्ता पुन्हा पवार कुटुंबियांनी खेचून आणली. गेल्या काही दिवसांपूर्वी माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. ग्रामपंचायत असतानाही बारामती तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत माळेगाव होती. आता नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतरही ती तालुक्यातील सर्वात मोठी नगरपंचायत ठरली आहे. या नगरपंचायतीची निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. माळेगांव नगरपंचायतीचे हे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन आता माळेगांव नगरपंचायत ताब्यात घेण्याचा निश्चय भारतीय जनता पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मिशन बारातमीच्या विजयाची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलले तर तातडीने पाच कोटींचा विकासनिधी दिला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने माळेगाव बारामती तालुक्यात मोठे गाव आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक, विधानसभा तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माळेगावात बुथ कमिटीतील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. विधानसभा, लोकसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात पवार कुटुंबियांकडून काटेवाडी येथून केली जाते. ही बाब लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही बारामती दौऱ्याची सुरुवात काटेवाडीपासून झाली. काटेवाडी येथील कन्हेरी मंदिराला भेट देऊन बावनकुळे यांनी काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशीही संवादही साधला.
हेही वाचा… भाजप प्रवेशाबाबत डॉ. विश्वजित कदम यांचा नकार; पण निराळ्या घटनाक्रमांमुळे चर्चेला जोर
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविणे खूपच सोपे झाले आहे. भारतीय जनता पक्षाला लोकांचा वाढता पाठिंबा आहे. ही बाब लक्षात घेऊन यापुढील काळात होणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच माळेगाव नगरपंचायत आणि तालुक्यातील अन्य नगरपंचायतीं जिंकायच्या आहेत, असे बावनकुळे यांनी या बैठकीत सांगितले. माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कृती आराखडा अमलात आणण्याचे आणि त्यामध्ये तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनीही योगदान देण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपच्या मिशन बारामती विजयाची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीपासून होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.