सुहास सरदेशमुख
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला मराठवाड्यात यश मिळाल्यानंतर भाजपने पुढच्या बांधणीचा भाग म्हणून निवडून आलेल्या सदस्यांचे सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसह सरपंचांचे मेळावे घेत भाजप प्रदेशाध्यक्ष नांदेड, लातूर आणि धाराशिव असा दौरा करणार आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बांधणी करण्यासाठी प्रत्येक महिन्यात केंद्र अथवा राज्यातील एक नेता विशेष उपक्रम आखत असून ज्या जिल्ह्यात ‘ कमळ’ फुलले नव्हते तेथे पुन्हा जोर लावण्यात येत आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांना फारसे यश मिळाले नाही. काही मोजक्या कार्यकर्त्यांना स्वबळावर मिळालेले यश वगळता ठाकरे गटास वर्चस्व निर्माण करता आले नाही. कळंब आणि मंठा या दोन बाजार समित्यांमध्ये खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील तसेच माजी आमदार शिवाजी चोथे यांना यश मिळाले. पण अन्यत्र बाजार समित्यांमध्ये भाजपचा वरचष्मा दिसून आला. धाराशीव जिल्ह्यात ७६ भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते निवडून आले. छत्रपतीसंभाजीनगरमध्ये फुलंब्री, गंगापूर, लासूर आदी बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदे गटाचा वरचष्मा दिसून आला. पारंपरिकपणे आमदारांच्या पाठिमागे थांबण्याची परंपरा लातूर जिल्ह्यात पाळली गेली. सेनेला सहानुभूती आणि निवडणुकीत भाजपला यश असे चित्र दिसून येत आहे. अशा वातावरणात भाजपने पुन्हा बांधणीचे नवे कार्यक्रम ठरविण्यास सुरूवात केली आहे.
आणखी वाचा-गडकरींना वारंवार अधिकाऱ्यांचे कान का पिळावे लागतात?
भाजप प्रदेशाध्यक्षांनी आता नांदेड, लातूर आणि धाराशीव असा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये ‘ वॉरिअर’ असे नामकरण करत १८ वयोगटातील तरुणांच्या दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच आणि बाजार समित्यांवर भाजपचे कार्यकर्ते असावेत अशी रचना केल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली की राज्य सरकारचा सहा हजार रुपयांचा हप्ताही जमा करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्याकडे सरकारकडून भर दिला जात असून त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका बाजूला कार्यकर्त्यांची बांधणी करायची आणि दुसरीकडे लाभाच्या योजना नीटपणे पोहचवायच्या ही कार्यपद्धती अवलंबून भाजपकडून पाऊल उचलली जात आहे. नांदेड, लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यात सत्कारांचे कार्यक्रम आणि कोअर कमेटीच्या बैठकींसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष ११ मे पासून मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत.