नागपूर : भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील कार्यालय त्याची भव्यता, अत्याधुनिकता आणि तेथे उपलब्ध सोयी-सुविधांमुळे ओळखले जाते. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे देशाच्या राजधानीतील कार्यालय कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणून दिल्लीतील भाजपच्या कार्यालया कडे बघितले जाते. त्याच धर्तीवर दिल्लीनंतरचे दुसरे मोठे भाजप कार्यालय राज्याच्या उपराजधानीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात उभे राहात आहे. त्याचे भूमिपूजन खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तवर रविवारी सकाळी पार पडले.
२०१४ मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यावर पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील भाजप कार्यालय बांधणीचे काम हाती घेतले होते. त्यानंतर टप्प्याने देशातील प्रमुख शहरांमधील कार्यालय स्वमालकीच्या जागेत बांधण्याचे धोरण ठरले. २०१४ मध्ये केद्रासोबतच महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आली. नागपूरकर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नागपूर शहर भाजप कार्यालयाच्या नव्या स्वमालकीच्या इमारतीत स्थानांतरित होण्याच्या चर्चेला सुरूवात झाली. तब्बल १० वर्षाने चर्चेला मूर्त रूप मिळाले. रविवारी ६ एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तवर भूमिपूजन होत आहे. दिल्लीनंतरचे दुसरे मोठे कार्यालय नागपूरचे असेल असे या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी विधानपरिषद सदस्य गिरीश व्यास यांनी सांगितले.
असे असेल कार्यालय
जुन्या नागपूरमधील महाल भागात पूर्वी भाजपचे शहर कार्यालय होते. आता याच भागातील नवी शुक्रवारीतील एक एकर जागेत भाजपचे भव्य कार्यालय बांधण्यात येणार आहे. या इमारतीत दोन माळे वाहनतळासाठी राखीव असणार आहे. प्रचंड मोठे सभागृहात, अत्याधुनिक सर्व सुविधा असणारे पत्रकार परिषद कक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्या मुक्कामाची व्यवस्था, भोजन कक्ष, कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाची व्यवस्था आणि इतरही अन्य सुविधा असणार आहे,. इमारत किती मजली असेल हे भाजप नेते सांगत नाही. आराखडा मंजुरीसाठी पाठवला आहे, असे सांगितले जाते. तीन वर्षात बांधकाम पूर्ण होणार, असे सांगितले जाते.
पक्ष आर्थिकदृष्ट्या संपन्न
कार्यकर्त्यांनी वर्गणी करून चालणारा पक्ष म्हणून भाजपची पूर्वी ओळख होती. २०१४ नंतर पक्ष केंद्रात, राज्यात सत्तेत आला अन् पक्षाने कात टाकली. आर्थिक संपन्न अशी आता या पक्षाची ओळख आहे. याचे प्रतिबिंब पक्षाच्या कार्यक्रमात, निवडणुकीत दिसून येते. पक्षाचे शहर कार्यालय यात कुठे मागे असणार नाही, असे बोलले जाते.