एकेकाळी ठाणे जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे पारंपरिक मतदार असलेल्या माळी, कोळी आणि वाल्मिकी समाज काही प्रमाणात भाजपाकडे वळल्याचे चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले असून आता समाजातील उर्वरित पारंपरिक मतदारांनाही भाजपाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. शनिवारी ठाणे शहराच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी या सर्व समाजाच्या नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी शहरातील महागिरी भागात जाऊन मुस्लिम महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यानिमित्ताने भाजपाने ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पारंपरिक मतांवर डोळा ठेवत त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
हेही वाचा- राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’त रायगडच्या नंदा म्हात्रेचा सहभाग
ठाणे जिल्हा हा मूळचा आगरी-कोळी बांधवांचा जिल्हा आहे. हा समाज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जातो. या समाजाचे नेतृत्व करणारे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. परंतु या दोन्ही नेत्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. या नेत्यांमुळे आगरी मतदार हा भाजपाकडे वळल्याचे चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले. त्याचप्रमाणे आता माळी, कोळी आणि वाल्मिकी समाजावर भाजपाचा डोळा आहे. जिल्ह्यात कोळी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाचे नेते कांती कोळी हे दोनदा ठाणे शहराचे आमदार राहिले असून ते काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत होते. हा समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरे हे सुद्धा कोळी समाजाचे होते. तरे यांच्यामुळे हा समाज शिवसेनेकडे काहीप्रमाणात वळला होता. परंतु हा समाज आता ठाणे जिल्ह्यातील विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये काही प्रमाणात भाजपाकडे वळाल्याचे दिसून आले.
हेही वाचा- संभाजी भिडे यांच्या भेटीमागे एकनाथ शिंदे यांचं दीर्घकालीन राजकीय गणित
ठाणे जिल्ह्यात माळी समाजही मोठ्याप्रमाणात आहे. नोकरी आणि कामानिमित्त हा समाज ठाण्यात स्थायिक झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचा पहिल्यापासूनच पगडा आहे. त्यामुळेच हा समाज ठाणे जिल्ह्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले होते. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर हा समाज काही प्रमाणात भाजपाकडे वळू लागल्याचे चित्र आहे. तर, वाल्मिकी समाज हा मूळचा दिल्लीचा असून हा समाजही काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. परंतु इतर समाजांप्रमाणेच हा समाजही भाजपाकडे वळताना दिसून येत आहे. यातूनच भाजपाने माळी, कोळी, वाल्मिकी समाजाच्या नेत्यांच्या पक्षातील महत्त्वाच्या पदांवर नेमणुका केल्या आहेत. या नेत्यांच्या माध्यमातूनच आता उर्वरित समाजातील पारंपरिक मतदारांनाही भाजपच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शनिवारी ठाणे शहराच्या दौऱ्यादरम्यान माळी, कोळी आणि वाल्मिकी समाजातील नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील मुस्लिम समाजही काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जात असून शनिवारच्या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांनी ठाणे शहरातील महागिरी भागात जाऊन मुस्लिम महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यान, महिलांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट म्हणून दिला हे उल्लेखनीय होय.