दिगंबर शिंदे
सांगली : माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात असले आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते म्हणून मान दिला जात असला तरी भाजपकडून त्यांची पद्धतशीरपणे कोंडी केली जात आहे. माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना कदम प्रतिनिधीत्व करीत असलेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून निवड करतानाच शासनाने विकास कामासाठी निधी देउन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पलूस-कडेगाव हा मतदार संघ माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पारंपारिक मतदार संघ म्हणून ओळखला जात असला तरी या मतदार संघात देशमुख गटाने त्यांना दोन वेळा पराभूतही केले होते. हा या मतदार संघाचा इतिहास आहे. १९९५ मध्ये डॉ. कदम यांना संपतराव देशमुख यांनी पहिल्यांदा पराभूत करून राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या निधनानंतर देशमुखांचा राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेल्या नवख्या पृथ्वीराज देशमुख यांनीही पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. मात्र, पंतगराव कदम यांच्या निधनानंतर विश्वजित कदम हे राजकीय वारस म्हणून पुढे आले. पोटनिवडणुकीत देशमुख गटाचे संग्रामसिंह देशमुख यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने पहिल्याच निवडणुकीत विश्वजित कदम यांना राजकीय यश मिळाले. २०१९ च्या निवडणुकीत देशमुख गटाला पराभूत व्हावे लागले तरी दोन्ही गटामध्ये मताधिक्य सात हजार एवढेच असल्याने या ठिकाणची निवडणुक नेहमीच काटा लढतीचीच ठरत आली आहे.
आणखी वाचा-पालघरमध्ये भाजपच्या तयारीनंतरही शिंदे गट ठाम
देशमुख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देउन भाजपने पलूस-कडेगावमध्ये कदम गटाला म्हणजेच डॉ.विश्वजित कदम यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षापासूनच सुरू केला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर देशमुख यांनीही मतदार संघात आपला गट अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न केले आहेत. गोपूज कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांशी असलेला दैनंदिन संपर्क तर कायम राखण्याबरोबरच विविध ग्रामपंचायतीमध्ये आपल्या विचाराचे लोक कसे असतील, गटबांधणी करीत असताना कार्यकर्त्यांना स्थानिक सत्तेच्या विरोधात जाउन कशी ताकद देता येईल याचा प्रयत्न तर सुरू आहेच, पण याचबरोबर भाजपचे विधानसभा प्रचार प्रमुख या नात्याने पक्षिय संघटन करण्यातही पुढाकार घेतला आहे. भाजपचे कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहचविण्याच्या निमित्ताने गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संपर्क अभियान राबविणे, पक्षाच्या बूथकमिटीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करून आपले विचार रूजविण्याचे काम सुरू आहे.
आणखी वाचा-रावसाहेब दानवे यांची गाडी विलंबाने पण रुळावर आली !
या मतदार संघात काँग्रेस आणि भाजप असे पारंपारिक विरोधक आज जरी दिसत असले तरी खरा संघर्ष हा कदम-देशमुख गटातच विभागला गेला आहे. या संघर्षाला पलूस तालुययातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरूण लाड याचा तिसरा कोनही आहे. कारण कुंडल परिसरात लाड यांचा स्वतंत्र गट ताकदवान आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कदम गटाला केवळ एक जागा मिळाली तर थेट सरपंच पद आणि १६ जागा जिंकत लाड गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या ठिकाणी कदम गटाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्याकडे आहे. मात्र, स्थानिक पातळीवर या गटाला फारसे स्थान मिळू शकले नाही. आमदार अरूण लाड यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद लाड सध्या पुढे आले असून जिल्हा परिषदेत पक्ष प्रतोद म्हणून त्यांनी कामही केले आहे, तर सध्या क्रांती कारखान्याची अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. या गटाची भूमिका देशमुख आणि कदम यांच्या राजकीय संघर्षामध्ये मोलाची ठरत आली आहे. लाड गटावर या मतदार संघातील हारजितचे पारडे फिरू शकते. सध्या तरी हा गट निरपेक्ष असला तरी भविष्यात तो निरपेक्ष राहीलच असेही नाही. यामुळे लढतीत या गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.