पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. मात्र, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपने ६७ ग्रामपंचायती ताब्यात घेत जोरदार मुसंडी मारली आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ता, आयाराम या घटकांच्या जोरावर पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात मर्यादित असलेल्या भाजपला हे यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
हेही वाचा- मोफत धान्य योजनेतून भाजपाची लोकसभा निवडणुकीची तयारी
स्वातंत्र्योत्तर काळापासून पुणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सलग १५ वर्षे राज्यात सत्ता असल्याने राष्ट्रवादीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपली ताकद चांगलीच वाढवली. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघांपैकी जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, इंदापूर, बारामती आणि मावळ अशा सात मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. उर्वरित तीनपैकी भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे अनुक्रमे संग्राम थोपटे आणि संजय जगताप निवडून आले आहेत, तर दौंड तालुक्यात भाजपचे राहुल कुल हे एकमेव आमदार आहेत.
हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेत व्यग्र असणाऱ्या राहुल गांधींची संसदेत केवळ ५३ टक्के उपस्थिती
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या आकडेवारीच्या तिपटीहून अधिक यश भाजपला मिळाले आहे. पुण्यातील ग्रामीण भागात मावळ तालुक्यापुरता मर्यादित पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. मात्र, आता इंदापूर, दौंड, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर अशा विविध तालुक्यांतील ग्रामपंचायती भाजपने काबिज केल्या आहेत. इंदापूरचे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि हवेलीचे राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कंद, घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा फराटे, रासपमधून भाजपात आलेले आणि दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे माजी सभापती खेडचे शरद बुट्टे पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. केंद्र-राज्यात सत्ता आणि आयाराम यांचा एकत्रित फायदा भाजपला झाल्याचे निकालवरून दिसून येत आहे.
राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्मला सीतारामन, रेणुका सिंह, प्रल्हादसिंह पटेल अशा केंद्रीय मंत्र्यांनी दौरे केले असून स्थानिक प्रश्नांसह, केंद्राच्या विविध योजना, प्रकल्पांची घोषणा केली आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून (डीपीसी) ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकारी, माजी आमदार यांना ताकद देण्यात येत आहे. याचा परिणाम लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा आहे.