शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच नव्याने अस्तित्वात येत असलेल्या सरकारमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर अनिल बाबर आणि भाजपचे सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि पक्षाचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांची मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाडे हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते. तर जिल्ह्यात भाजपचे ते पहिले आमदार म्हणून ओळखले जातात.
शिवसेनेतील शिंदे यांच्या बंडखोरीमध्ये प्रथमपासून सहभागी असलेले बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचा विधिमंडळाचा अनुभवही अधिक असून गेल्या महिन्यातच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये म्हणणेच ऐकून घेतले जात नसल्याने या सरकारचे भवितव्य कठीण असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच खाडे यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत भाजपकडून समाविष्ट केले जाण्याची शक्यताही भाजपमधून व्यक्त केली जात आहे. त्यांना फडणवीस सरकारच्या काळात अखेरच्या टप्प्यात मंत्रीपदाची संधी मिळाली होती. यामुळे त्याचेही नाव निश्चित मानले जात आहे. तसेच आमदार पडळकर हे फडणवीस यांच्या निकटचे म्हणून ओळखले जातात. पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते कायम आक्रमकपणे राष्ट्रवादीच्या विरोधात वक्तव्ये करतात. यामुळे सरकारमध्ये आक्रमक चेहरा म्हणून त्यांची वर्णी लागू शकते. तर सुधीर गाडगीळ एक संयमी म्हणून या वेळी त्यांना राज्यमंत्री पदाची संधी दिली जाऊ शकते, असे भाजपच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

ठाकरे सरकार गडगडल्यानंतर सांगली, मिरजेत फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कार्यभार होता. मात्र, गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत सत्तेचा लाभ प्रामुख्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनाच झाल्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. यामुळे ठाकरे सरकार कोसळल्यामुळे सेनेचे फारसे नुकसान झालेले नसले तरी पक्ष प्रमुख ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Story img Loader